मुंबई – कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही गोष्टीचे व्यसन करू नये असे म्हटले जाते. समजा एखादे व्यसन जडलेच तर ते सोडविण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न करणारे खूप कमी लोक त्यात यशस्वी होतात. तर अनेकांचे घर-संसार उद्ध्वस्त झालेले पहायला मिळतात. येथे आपण अशाच एका व्यसनाची गोष्ट सांगणार आहोत. हे व्यसन तुम्हा-आम्हाला कमी-अधिक प्रमाणात सर्वांनाच जडलेले आहे. ते व्यसन आहे फेसबुक किंवा कोणत्याही सोशल मीडिया साइट्सचे. रात्रं-दिवस फेसबुकवर पडिक राहणारे अनेक युजर्स आपण पाहतो. पण त्यामुळे अनेकांची क्रियाशीलता नष्ट होते. फेसबुकचे व्यसन सोडविण्यासाठी एका उद्योजकाने महिलेला चापट मारण्याची नोकरी दिली. होय हे खरंय. संपूर्ण गोष्ट काय आहे ते जाणून घेऊयात.
एका भारतीय-अमेरिकी उद्योजकाने त्याला चापट मारण्यासाठी एका महिलेला नोकरी दिली. अशी मनोरंजक नोकरी देणार्या भारतीय-अमेरिकी उद्योजकाचे नाव आहे मनीष सेठी. जेव्हा कधी उद्योजक मनीष सेठी फेसबुक उघडतील, तेव्हा संबंधित महिलेला त्यांना चापट मारायची, असा हा जॉब आहे. या महिलेचे कारा असे नाव आहे. चापट मारण्यासाठी महिलेला ८ डॉलर प्रतितासाच्या हिशेबाने पगार दिला जातो.
जवळपास ९ वर्षांपूर्वी नोकरी करणार्या या महिलेचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यावेळी या व्हिडिओची जोरदार चर्चा झाली होती. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी नुकताच हा व्हिडिओ सोशल मीडियावर इमोजीसह शेअर केला आहे. त्यानंतर पुन्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ शेअर करताना सेठी यांनी २०१२ मध्ये लिहिले होते, की मी माझा वेळेचा दुरुपयोग करत असल्यास मला थांबविणे तुमचे काम आहे. गरज पडल्यास तुम्ही चापटही मारू शकतात. अॅलन मस्क यांनी व्हिडिओ शेअर करताच मनीष सेठी यांनी त्यावर रिप्लाय दिला. मनीष सेठी म्हणाले, या फोटोमधील मुलगा मीच आहे. अॅलन मस्क यांनी शेअर केल्यानंतर कदाचित माझा रिच वाढणार आहे.
फेसबुकचे व्यसन
उद्योजक होण्यासह मनीष सेठी एक ब्लॉगरसुद्धा आहेत. मनीष सेठी यांना फेसबुकचे व्यसन लागले होते. त्यामुळे जेव्हा कधी ते काम करत असे, तेव्हा ते या महिलेला शेजारी बसवत असे. कामातून लक्ष हटवून ते फेसुबक पाहू लागले की ती महिला त्यांना चापट मारेल आणि ते फेसबुक सोडून पुन्हा कामाकडे लक्ष देतील, हाच त्यांचा उद्देश होता. एका ब्लॉग पोस्टमध्ये सेठी म्हणाले, की साधारण दिवसात त्यांचा उत्पादकता दर ३५-४० टक्क्यांच्या आसपास होता. परंतु कारा त्यांच्या शेजारी बसू लागल्यानंतर तोच दर ९८ टक्क्यांपर्यंत वाढला.