मुंबई – भारतीय रेल्वे हे आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. एवढेच नव्हे तर, एका देशाच्या मालकीच्या बाबतीत भारतीय रेल्वे हे जगातील चौथे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतातील एकूण रेल्वे स्थानकांची संख्या सुमारे ८ हजार आहे. यात अशी अनेक रेल्वे स्थानके असून काही स्थानके विविध कारणास्तव प्रसिद्ध आहेत.
आपल्या देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकाचे स्वतःचे नाव आणि स्टेशन कोड आहेत, त्यानुसार त्याला ओळखतात. आपण आज भारतातील अशा अनोख्या रेल्वे स्थानकाबद्दल जाणून घेऊ या, ज्या स्टेशनला स्वतःचे नावच नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमध्ये बर्धमानपासून सुमारे ३५ कि.मी. अंतरावर आहे. बांकुरा-मसग्राम रेल्वे मार्गावर वसलेले हे स्टेशन रैना आणि रैनागढ़ या दोन गावाच्या मध्ये आहे. सुरुवातीला हे स्टेशन रैनागड म्हणून ओळखले जात असे. मात्र रैना गावातील लोकांना ही गोष्ट आवडली नाही. कारण या स्थानकाची इमारत रैना गावच्या जमिनीवर बांधण्यात आली होती.
रैना गावातील लोकांची अशी मागणी होती की, या स्थानकाचे नाव रैनागडऐवजी रैना असावे. या प्रकरणी दोन ग्रामस्थांमध्ये भांडण सुरू झाले. त्यानंतर आता स्टेशनच्या नावावरून भांडण रेल्वे बोर्डावर पोहोचले आहे. या भांडणानंतर भारतीय रेल्वेने येथे बसवलेल्या सर्व फलकांवरून (साइन बोर्डमधून) स्थानकाचे नाव खोडून काढले, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तथापि, रेल्वे विभाग अद्याप प्रवाशांना मात्र जुन्या नावाने म्हणजे रैनागड या नावाने स्टेशनवर तिकिटे देत असते.