इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – असे म्हणतात की माणसानंतर माकड हा असा प्राणी आहे ज्याला मेंदू आहे आणि तो विचार करू शकतो. माणूस आणि माकडाच्या अनेक रंजक गोष्टीही तुम्ही ऐकलेल्या असतील. माणसाने माकडाचा वापर आपल्या फायद्यासाठी केल्याचेही अनेक ठिकाणी दिसून आले आहे. परंतु एक माकड एका आरोपीच्या मदतीला धावून येईल असा विचार तुम्ही कधी केला आहे का? ही घटना सत्य आहे आणि ती जयपूरमध्ये घडली आहे.
एका खून प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली, त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा केले. पण हे पुरावे न्यायालयात सादर करण्याची वेळ आली, तेव्हा पोलिसांनी सांगितलेला तर्क ऐकून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल. या खून प्रकरणातील पोलिसांनी गोळा केलेले पुरावे माकडाने चोरले, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. या पुराव्यामध्ये आरोपीने गुन्ह्यात वापरलेला चाकूही होता असे बोलले जात आहे.
हे प्रकरण राजस्थानमधील जयपूरच्या कनिष्ठ न्यायालयातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून सप्टेंबर २०१६ मध्ये झाला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार त्या वेळी चांदवाजी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शशिकांत शर्मा नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती. शर्मा यांचा मृतदेह आढळल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत जयपूर-दिल्ली महामार्ग बंद केला होता. पाच दिवसांनंतर पोलिसांनी या प्रकरणी चांदवाजीमध्ये राहणाऱ्या राहुल कंदेरा आणि मोहनलाल कंदेरा यांना अटक केली होती. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली दोघांना अटक करून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांसमोर हजर केले होते.
या प्रकरणात गोळा केलेले सर्व पुरावे एका बॅगमध्ये घेऊन पोलिस न्यायालयात जात होते. बॅगमध्ये हत्येत वापरण्यात आलेल्या चाकूसह इतर १५ महत्त्वाचे पुरावे ठेवलेले होते. गोदामातील जागेच्या अभावामुळे पुराव्याची ही बॅग एका झाडाखाली ठेवण्यात आली होती. न्यायालयाने नुकतेच पुरावे सादर करण्याचे आदेश दिले, तेव्हा पोलिसांनी ही बॅग माकडाने चोरली असल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांनी न्यायालयाकडे लिखित म्हणणे मांडले आहे.