जयपूर (राजस्थान) – आपल्या भारत देशात अनेक गूढ आणि प्राचीन मंदिरे आहेत, असे एक रहस्यमय मंदिर राजस्थानमध्ये आहे, जेथे संध्याकाळ होताच लोक येथून निघून जातात. कारण रात्रीच्या वेळी कोणालाही या मंदिरात रहायचे नसते. यामागील कारण देखील खूप रंजक आहे. या परिसरातील लोकांचा असा विश्वास आहे की, या मंदिरात रात्री जे कोणी थांबतात ते दगड होतात.
आज आपण माहिती घेत आहोत ते बाडनेर जिल्ह्यातील किराडू मंदिराविषयी. या मंदिरास राजस्थानचे खजुराहो देखील म्हटले जाते. वास्तविक दक्षिण भारतीय शैलीत बांधलेले हे मंदिर वास्तुकलेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या जागेला ‘किरत कुप’ असे नाव इ.स.पू. ११११ मध्ये देण्यात आले. किराडू ही पाच मंदिरांची मालिका आहे. त्यातील विष्णू मंदिर आणि शिव मंदिर (सोमेश्वर मंदिर) थोड्या चांगल्या अवस्थेत आहेत, तर उर्वरित मंदिरे अवशेषांमध्ये उरलेली आहेत. ही मंदिरे कोणी बांधली हे कोणालाही माहित नाही, परंतु या मंदिरांची रचना पाहता असा अंदाज केला जातो की, ते गुर्जर-प्रतिहार राजवंश, संगम राजवंश किंवा दक्षिणेच्या गुप्ता घराण्याच्या काळात बांधले गेले असावेत.
किराडू मंदिराविषयी अशी समजूत आहे की, खूप वर्षांपूर्वी एक सिद्ध साधू आपल्या काही शिष्यांसह येथे आला होता. एक दिवस तो आपल्या शिष्यांना तिथे घेऊन गेला आणि त्यानंतर शिष्यांना येथे ठेवून तो साधू जंगलात फिरायला गेला. दरम्यान, एका शिष्याची तब्येत अधिकच खालावली. तेव्हा बाकीच्या शिष्यांनी गावकऱ्यांची मदत मागितली, पण कोणीही त्यांना मदत केली नाही. नंतर जेव्हा सिद्ध साधू तिथे आला, तेव्हा त्यांना सर्व गोष्टी कळल्या. यावर तो साधू संतापला आणि त्याने गावकऱ्यांना शाप दिला की, सूर्यास्तानंतर सर्व लोक दगड बनतील. मात्र त्याच वेळी एका महिलेने त्या शिष्यांना मदत केली होती, म्हणून त्या साधूने त्या स्त्रीला संध्याकाळ होण्यापूर्वी गाव सोडून परत मागे वळून न पाहण्यास सांगितले होते, परंतु त्या स्त्रीने त्याचे ऐकले नाही आणि मागे वळून पाहिले. त्यानंतर, ती स्त्री दगड बनली. मंदिरापासून काही अंतरावर त्या स्त्रीचा पुतळा देखील बसविला आहे.
अख्यायिका आणि समजुतींमुळे याठिकाणी रात्री कुणीही थांबत नाही. जे दर्शनासाठी येतात ते सायंकाळीच परतीच्या प्रवासाला निघतात.