मुंबई – आपला भारत देश हा केवळ मंदिरांचाच नाही तर किल्ल्यांचाही देश म्हणून ओळखला जातो. कारण आपल्या देशाच्या विविध भागात देशात हजारो किल्ले हे शेकडो वर्षे जुने आहेत. विशेष म्हणजे असे अनेक किल्ले आहेत, ज्यांच्या बांधकामाबद्दल कोणालाही माहिती नाही. हे प्राचीन किल्ले नेहमीच गूढ आणि कुतूहलाचा विषय राहिले आहेत.
असाच एक किल्ला भारतात अस्तित्वात असून अतिशय गूढ आहे.
उत्तर प्रदेशातील झाशीपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर गढकुंदर किल्ला ११ व्या शतकात बांधलेला असून तो पाच मजल्यांचा आहे, त्यामध्ये तीन मजले वर दिसतात, तर दोन मजले जमिनीच्या खाली आहेत. परंतु सदर किल्ला हा कधी आणि कोणी बांधला याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही, मात्र हा किल्ला सुमारे २००० वर्ष जुना असल्याचे सांगितले जाते.
चंदेला, बुंदेला आणि खांगरांसारख्या अनेक राज्यकर्त्यांनी त्यावर राज्य केले. विशेष म्हणजे गढकुंदरचा किल्ला हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बांधलेला एक अनोखा नमुना आहे, तसेच हा किल्ला अशा प्रकारे बांधला गेला आहे की, तो चार-पाच किलोमीटर दूरवरूनच दिसतो, पण ज्या मार्गाने किल्ला दुरून दिसतो, त्याच वाटेने आलात, तर ती वाट किल्ल्याऐवजी दुसरीकडे जाते, कारण किल्ल्यावर जाण्यासाठी दुसरा मार्ग आहे.
गढकुंदर किल्ल्याची गणना भारतातील सर्वात गूढ किल्ल्यांमध्ये केली जाते. याबद्दल काही लोक सांगतात की, खूप पूर्वीपासून जवळच्या गावात एक मिरवणूक आली होती. गडाच्या दर्शनासाठी काही लोक आजूबाजूला असताना चक्क तळघरात गेले, त्यानंतर ते अचानक गूढपणे गायब झाले. त्यातील सुमारे ६० लोकांना आजपर्यंत शोधता आले नाही. यानंतरही पुन्हा अशा काही दुर्घटना घडल्याने किल्ल्याकडे जाणारे सर्व दरवाजे बंद करण्यात आले.
सदर किल्ला एका चक्रव्यूहाप्रमाणे असून एखाद्या वेळी याबद्दल कोणतीही माहिती नसेल तर आपण थेट भुयारात जाऊन दिशा विसरू शकतो. या किल्ल्यातील अंधारामुळे दिवसासुद्धा येथे भितीदायक वाटते. असे म्हटले जाते की, किल्ल्यामध्ये एका खजिन्याचे रहस्य देखील दडलेले आहे, त्याच्या शोधात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. काही इतिहास तज्ज्ञ सांगतात की, येथील काही राजांना सोने, हिरे आणि रत्नांची कमतरता नव्हती. मात्र त्यानंतर अनेकांनी येथे खजिना शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अपयश आले.