अहमदाबाद – गुजरातमधील एका व्यक्तीने ‘माझे अंतर्मन लस घेण्याची परवानगी देत नाही’ असे उत्तर देऊन साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. वायुसेनाचा हा कर्मचारी आयुर्वेदिक काढ्यांचा दाखला देऊन लस घेण्यास नकार देत असल्याने त्याच्यावर कारवाईचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला होता.
लस न घेण्यासाठी लोकांनी असंख्य कारणे शोधून काढली आहेत. कुणी कोरोना होईल या भीतीने घेतलेले नाही तर कुणी आधीपासून प्रतिकारक्षमता चांगली असल्याचे सांगत नकार देत आहे. तर काही कारणे अत्यंत वेगळी असून डोक्यावर हात मारण्यास भाग पाडत आहेत. गुजरातमध्येही अशीच घटना घडली.
वायुसेना कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने लस घेण्यास नकार दिल्यामुळे त्याला नोटीस बजावण्यात आली. त्या नोटीसीला या कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने वायुसेनेला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
न्या. ए.जे. देसाई आणि न्या. ए.पी. ठाकेर यांच्या विभागीय खंडपीठाने वायूसेनासह केंद्रसरकारलाही नोटीस बजावली होती. सोबतच १ जुलैपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यावर कुठलीही दंडात्मक कारवाई करू नये, असे आदेशही दिले. वायुसेना कॉर्पोरल व याचिकाकर्ता योगेंद्र कुमार यांनी १० मे ला प्राप्त कारणे दाखवा नोटीसला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ‘लस घेण्यास नकार देणे हा नियमांचा भंग आहे. तसेच तुमचे सेवेत राहणे इतर सैनिक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे,’ असे नोटिशीत नमूद होते.
कर्मचाऱ्याने असे दिले उत्तर
नोटिशीला उत्तर देताना याचिकाकर्त्याने, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपण आयुर्वेदिक औषधे घेत असल्याचे म्हटले आहे. ‘आपात्कालीन परिस्थितीतच मी एलोपॅथी औषधांचा आधार घेत असतो. एरवी मी आयुर्वेदिक औषधे व काढ्यांचे नियमित सेवन करतो. त्यामुळे माझे अंतर्मन मला लस घेण्यास परवानगी देत नाही,’ असे या कर्मचाऱ्याने वायुसेनेला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.