इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. सीमाशुल्क विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई सीमाशुल्क विभाग झोन III येथील अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या दोन भारतीय नागरिकांना अडवले. त्यांच्या चेक-इन केलेल्या सामानाची तपासणी केली असता अधिकाऱ्यांना त्यात हवाबंद केलेली अनेक पाकीटे सापडली. या प्रवाशांनी वाहून आणलेल्या ट्रॉली बॅगमध्ये ठेवलेल्या उशाच्या अभ्र्यामध्ये हा अवैध पदार्थ लपवण्यात आला होता.
या पाकिटांमध्ये हिरव्या रंगाचा पदार्थ होता, जो प्राथमिकदृष्ट्या हायड्रोपोनिक गांजा असल्याचे आढळले. एकूण ११.८८१ किलोग्रॅम निव्वळ वजन असलेल्या या अमली पदार्थाची बेकायदेशीर बाजारातील अंदाजे किंमत ११.८८ कोटी रुपये आहे. या दोन्ही प्रवाशांना अमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) कायदा, १९८५ च्या संबंधित तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. या तस्करीच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या मोठ्या जाळ्याची ओळख पटवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.