मनीष कुलकर्णी, इंडिया दर्पण वृत्तसेवा
वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीच्या नूतनीकरणाशी संबंधित नियमांमध्ये विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून (इरडा) बदल करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासदंर्भात इरडाने मसुदा जारी केला आहे. या मसुद्यानुसार, पॉलिसीधारकांच्या जोखीम प्रोफाइलमध्ये सुधारणा झाल्यास विमा कंपन्या सवलती देऊ शकणार आहेत. आरोग्य आणि जीवन विम्याशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे.
मसुद्यानुसार, आता कोणत्याही विमा कंपनीला पॉलिसीधारकांच्या वयाच्या आधारावरून वैयक्तिक अपघाताच्या विम्याची मुदत दीर्घकाळासाठी वाढवता येऊ शकणार आहे. त्याला कंपनी नकार देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे विमा पॉलिसी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पोर्ट करण्याचा प्रस्तावसुद्धा ठेवण्यात आला आहे. प्रस्तावानुसार, विमाधारकाकडून पोर्टेबिलिटीचा अर्ज मिळाल्याच्या पाच दिवसाच्या आत नवी विमा कंपनी, सध्याच्या विमा कंपनीकडून आवश्यक माहिती मागू शकणार आहे. निर्धारित मुदतीच्या आत विमा पोर्टेबिलिटी सहज शक्य करण्यासाठीहा बदल करण्यात येत आहे.
सध्याच्या नियमांनुसार, प्रवास विमा उत्पादने, वैयक्तिक अपघात उत्पादन आणि महत्त्वाकांक्षी उत्पादने दीर्घकाळासाठी नूतनीकरण करता येत नाही. तर इतर विमा उत्पादनांचे नूतनीकरण करता येऊ शकते. इरडाने वैयक्तिक अपघात उत्पादने दीर्घकाळासाठी नूतनीकरणाच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. इरडाच्या मसुद्यामधील प्रस्तावानुसार, पॉलिसीधारकांच्या जोखीम प्रोफाइलमध्ये सुधारणा झाल्यास विमा कंपन्या सवलत देण्यासाठी पुढाकार घेऊ शकतील. सध्या ग्राहकांच्या जोखीम प्रोफाइलमध्ये सुधारणा झाल्यानंतर कंपन्या नूतनीकरणाच्या वेळी लोडिंग हटविण्याचा पर्याय देतात. उच्च जोखीम असलेल्या ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम म्हणून प्रीमियमच्या स्वरूपात घेतल्या जाणाऱ्या रकमेला लोडिंग असे म्हणतात.