इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशभरात अनेक विमा कंपन्या असून अनेक नागरिक विमा काढतात, तसेच विम्याचे दावे देखील दाखल करतात. मात्र देशातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना विम्याचा दावा मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. विमा कंपन्या त्यांना क्लेम देण्यासाठी घाई करतात आणि त्यात बराच वेळ जातो, असे एका पाहणीत आढळून आले आहे. तसेच या नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा खूप महाग विमा पडतो.
विमा दलाली सोर्स नाऊ संस्थेने एका सर्वेक्षणात म्हटले आहे की, सुमारे 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांना विमा दावा लवकर मिळतो. पण यापेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी एक आठवडा जास्त लागतो. हे सर्वेक्षण आरोग्य विमा घेणाऱ्या १,२५० ग्राहकांमध्ये करण्यात आले. यामध्ये ५७६ ज्येष्ठ नागरिक होते.
सर्वसामान्यांना 23.2 दिवसांत विमा क्लेम मिळत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. परंतु 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना ते मिळण्यासाठी 28 दिवस लागतात. ज्येष्ठ नागरिकांना दावा जलदगतीने मिळावा यासाठी विमा कंपन्यांकडून सातत्याने उपाययोजना केल्या जात असल्या तरी अद्याप त्यांना त्यात यश आलेले नाही.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विमा दावा मिळण्यास विलंब होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे कारण ते रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विमा कंपनीला लवकर कळवू शकत नाहीत. तसेच, ते बराच काळ रुग्णालयात राहतात. याशिवाय उपचाराचा खर्चही जास्त आहे. अशा स्थितीत विमा कंपन्यांना हे सर्व निकाली काढण्यासाठी वेळ लागतो.
एखाद्या 30 वर्षांच्या व्यक्तीने जर आरोग्य विमा खरेदी केला आणि त्याचा प्रीमियम 10,365 रुपये असेल, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच प्रीमियम 31,905 रुपये होईल. सुमारे ४५ वर्षांच्या व्यक्तीसाठी हा प्रीमियम १५,२३९ रुपये होतो. सुमारे 75 वर्षांच्या व्यक्तीला यासाठी 66,368 रुपये द्यावे लागतील. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य विमा उत्पादन निवडणेही अवघड काम आहे. अतिसार आणि कर्करोग यांसारख्या आजारांचे दावे मिळण्यास अधिक विलंब होत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे.
Insurance Companies Senior Citizens harass