अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
फोटो शेअर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इन्स्टाग्राम लवकरच सबस्क्रिप्शन फिचर आणण्यात येणार आहे. यामुळे कंटेट तयार करणाऱ्यांना फॉलोअर्सच्या संख्येनुसार पैसे कमावता येतील. तसेच, इन्स्टाग्रामलाही आर्थिक बळ यातून मिळू शकणार आहे. एकूणच, यूट्यूबप्रमाणे आता इन्स्टाग्रामवरही पैसे कमावता येणार आहेत.
मेटा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या मते, इन्स्टाग्राम सध्या सबस्क्रिप्शनच्या दृष्टीकोनातून काम करत आहे. जे कोणी या व्यासपीठावर कंटेट म्हणजेच मजकूर तयार करुन सादर करत असतील त्यांना दरमहा पैसे मिळतील. यामध्ये वापरकर्त्यांना विशिष्ट प्रकारचा कंटेंट पाहण्यासाठी मासिक आधारावर ०.९९ डॉलर प्रति महिना ते ९९.९९ डॉलर प्रति महिना भरावे लागतील. सध्या, बास्केटबॉलपटू सेडोना प्रिन्स, मॉडेल केल्सी कुक, अभिनेता-प्रभावशाली अॅलन चिकिन चाऊ, ऑलिम्पिक जिम्नॅस्ट जॉर्डन चिली आणि डिजिटल निर्माता लूनी यांच्यासह केवळ १० अमेरिकन निर्मात्यांना पेड सबस्क्राईबरची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
इंस्टाग्राम सब्सक्राइबर फीचरमध्ये, तीन नवीन विशेष फीचर्स सब्सक्राइबर लाइफ, सब्सक्राइबर स्टोरीज आणि सब्सक्राइबर बॅज दिले जातील. याशिवाय, निर्माते त्यांच्या ग्राहकांशी थेट संवादही या माध्यमातून करु शकणार आहेत. सध्या इन्स्टाग्राम अॅपमध्ये स्टोरीज रिडिझाइनवरदेखील काम सुरु आहे. तुर्कीमधील काही वापरकर्त्यांना तर इन्स्टाग्रामचे अपडेटेड व्हर्जन वापरायला मिळत आहे. या नवीन व्हर्जनमध्ये उभ्या किंवा खालच्या बाजूला स्वाईप करुन निर्मात्यांच्या स्टोरीज बघता येणार आहे. एकूणच इन्स्टाग्रामवर वेळ फुकट जातो असे म्हणणाऱ्यांना आता तसे वाटणार नाही. कारण पैसे मिळवण्याचे माध्यम म्हणून याकडे पाहिले जाणार आहे. भारतीयांच्या हातातही हे अपडेटेड व्हर्जन लवकरच येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.