अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
फेसबुकचे मेटा प्लॅटफॉर्मने एक नवीन टूल लॉन्च केले आहे, जे पॅरेंटल सुपरव्हिजन टूल्स नावाने सादर केले गेले आहे. सोप्या शब्दात या टूलच्या मदतीने पालकांना इन्स्टाग्राम वापरताना मुलांवर लक्ष ठेवता येणार आहे. मुलं किती काळ इन्स्टाग्राम वापरतात, यावरदेखील पालक लक्ष ठेवू शकणार आहेत.
गेल्या काही काळात अल्पवयीन मुलांडून सोशल मीडियाचा गैरवापर, हवा तसा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. काही मुलामुलींना तर यामुळे न्यायालयीन बाबींचाही सामना करावा लागला आहे. त्यामुळे या माध्यमावर अल्पवयीन मुलांसाठी नियम असण्याची गरज व्यक्त करण्यात येत होती. युरोपीय देशांनीही ही गरज व्यक्त केली होती. मेटा कंपनीने पॅरेंट्स सुपरव्हिजन फीचर्स लाँच केले. सोशल मीडिया वापरताना मुलांचंही संरक्षण व्हावं, त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठीही हे पॅरेंटल कंट्रोल टूल आणल्याची माहिती मेटाने दिली आहे. हे टूल येत्या बुधवारपासून युनायटेड स्टेट्समध्ये उपलब्ध होणार आहे. जागतिक स्तरावर हे फिचर येत्या काही महिन्यांत आणले जाईल.
भारतातदेखील अल्पवयीन मुले सोशल मीडियाच्या आहारी जात असल्याने व त्यावर कोणाचे नियंत्रण नसल्याने हा चिंतेचा विषय ठरतो आहे. मध्यंतरी सोशल मीडियावर शिवीगाळ करणाऱ्या मुलांना पोलिसांनी पकडल्याची घटना पुण्यात घडली होती. त्या प्रकरणावरुन पुन्हा एकदा सोशल मीडियाचे समाजासमोर असलेले आव्हान अधोरेखित झाले होते. आता हे फिचर आणले जात असल्याने या वापरावर लगाम बसू शकेल. पालकांची नजर राहिल्याने मुलेही या साधनाचा वापर जपून करतील, असा विश्वास मेटाने व्यक्त केला आहे.
पालकांना त्यांचे मूल कोणाला फॉलो करत आहे, काय बघत आहे, हे पाहण्यासाठी मुलाचे खाते पाहण्याचा अधिकार मेटा देणार आहे. तसेच, एका दिवसात किती वेळ आपले मूल इन्स्टाग्राम अॅप वापरत आहे, हेदेखील कळणार असून, किती वेळ वापरायचे याची वेळही निश्चित करता येणार आहे.