मुंबई – सोशल मीडियावरील फ्रेण्डशीप कशी अंगलटी येते याची जगभरात असंख्य उदाहरणे आहेत. मात्र तरीही या मोहापासून अनेक तरुण स्वतःला लांब ठेवू शकलेले नाहीत. त्याचे दुष्परिणामही त्यांना भोगावे लागत आहेत. अलीकडचीच एक घटना बघा. एका तरुणीने इन्स्टाग्रामवर एका तरुणासोबत मैत्री केली. ही मैत्री वाढत गेली आणि शेवटी तिला बलात्काराला सामोरे जावे लागले.
तुमचे आयुष्य उध्वस्त करण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे अनेक तरुण सोशल मिडीयावर चोवीस तास पहारा देत असतात. मुलींना फसविणे, त्यांच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करणे आणि नंतर ब्लॅकमेल करणे एवढाच त्यांचा उद्देश असतो. या तरुणानेसुद्धा मैत्री केली आणि एक दिवस तिला भेटून तिच्या खाण्यात अमली पदार्थ मिक्स केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. ही बाब कळल्यानंतर तरुणीने पोलिसांत जाण्याचा इशारा दिला तर त्याने व्हिडीयो लिक करण्याची धमकी देऊन १ लाख रुपयेही तिच्याकडून घेतले. या आरोपीने तरुणीच्या कुटुंबालाही जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर पाणी डोक्यावरून जाऊ लागल्याने पोलिसांत तक्रार दिली. आता पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत.
रेवाडी येथील ही तरुणी सीएसच्या कोचिंगसाठी फरिदाबादला जायची. याचदरम्यान चरखी दादरी येथील पंकज नावाच्या तरुणाशी तिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. मैत्री वाढत गेल्यानंतर पंकजने तिला भेटण्याचा प्लान आखला. गुरुग्राम येथील एका हॉटेलमध्ये तिला भेटायला बोलावले. तिथे तिच्या खाण्यात अंमली पदार्थ मिक्स केले. तिला वाईनही पाजली. त्यानंतर तिची शुद्ध हरपली व ती झिंगायला लागली. त्याचाच फायदा घेत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. पण तरुणी विरोध करायला लागताच तो व्हिडीयो व फोटो शूट करू लागला. व्हिडीयोचीच धमकी देऊन तो ब्लॅकमेल करायला लागला. त्यावर त्याने एक लाख रुपयेही तरुणीकडून घेतले.