नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रंग माझा वेगळा’ फेम मराठी टीव्ही बालकलाकार साईशा भोईरची आई पूजा भोईर पोलीस कोठडीत आहे. पूजाने १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका शैक्षणिक संस्थेच्या संचालकाने आणि त्याच्या पत्नीने केली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी कफ परेड पोलिसांनी पूजाला अटक केली होती. तेव्हापासून ती कोठडीत होती आणि आता तिच्या कोठडीत दि. ८ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आणखी नागरिकांनी तिच्यावर फसवणूक केल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. आता पूजा भोईर आणि तिचे पती विशांत भोईर यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार असल्याचे समजते.
एवढी आहे मालमत्ता
पूजा भोईर हिला मे २०२३ मध्ये आर्थिक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती. पूजाकडं २७ लाखांचे सोने असल्याचे उघड झाले आहे. तसेच घरात दोन अलिशान गाड्या असताना काही महिन्यांपूर्वी तिने आणखी एक महागडी कार खरेदी केली. तसेच अकाऊंटमध्ये तब्बल तीन कोटी तीन लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. याशिवाय तिच्या नावावर मुंबईत अलिशान फ्लॅट असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पोलिस आता पूजाचे बॅंक अकाऊंट गोठवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सन २०२२मध्ये तिने चार वेळा परदेश ट्रीप केल्याचेही उघड झाले आहे. पूजा आणि विशांतसोबतच पूजाच्या आईनेही अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचे वृत्त आहे.
त्याचीही होणार चौकशी
अल्गो ऑप्शन्स ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक केल्यास ७.७ टक्के मोबदला देण्याचे सांगत पूजा भोईर हिने तिच्या अनेक इन्स्टाग्राम फॉलोअर्संना गंडा घातला आहे. त्यातच पूजा आणि विशांत यांनी गेल्या दोन वर्षात कोट्यवधींची खरेदी केली आहे. आता कार, बँक खाती आणि साईशाच्या खात्यांशी संबंधित बचतीचे पैसे यासह इतर मालमत्तांचा शोध सुरू असून त्या लवकरच जप्त केल्या जातील. विशांत व पूजाने साईशाबरोबर केलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय ट्रिपचीही पोलीस चौकशी करणार आहेत. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी तपास हाती घेणार आहे. दुसरीकडे, नाशिकमधील काही जणांनी पूजाचा पती विशांत भोईरविरोधात लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रारी दिल्या आहेत. सध्या विशांत फरार असून लवकरच साईशाची तिच्या मालिकेच्या सेटवर चौकशी केली जाणार आहे.
नाशिकचे प्रकरण
गंगापूररोडवरील अतुल सोहनलाल शर्मा (वय ६६, रा. सिरीन मिडोज, गंगापूररोड) यांनी सरकारवाडा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या भोईरचा ताबा आर्थिक गुन्हे शाखेने घेतला. पूजा रिलस्टार असून तिची मुलगी मराठी मालिकांमध्ये बालकलाकार असल्याने या शेअर्स घोटाळ्याला हायप्रोफाइल वलय निर्माण झाले आहे. दरम्यान भोईर यांच्या अटकेनंतर पुन्हा चार दिवसांची वाढ करण्यात आली होती. सोमवारी तिची कोठडी संपल्याने पुन्हा कोर्टात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
असा केला अपहार
मुंबईत सोळा लाखांचा अपहार केल्याचा गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर नाशिक पोलिसांनी तिचा ताबा घेतला होता. नाशिकच्या पथकाने ठाण्यात तळ ठोकून शेअर घोटाळा-२ चा पर्दाफाश केला आहे. पूजाच्या चौकशीत बँक खात्यांमधील लाखोंचे आर्थिक व्यवहार आढळून आले आहेत. अल्गो ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास ७.७ टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखवत पूजा विशांत भोईर (३२) आणि विशांत विश्वास भोईर (३५, रा. कल्याण, ठाणे) या दांम्पत्याने अनेकांना लाखोंना गंडविल्या चे पुढे आले आहे. पोलिसांनी भोईर यांच्या मालमत्तेसह डिमॅट खात्याची चौकशी सुरू केली असून, या खात्यात तीन कोटी रुपयांचे शेअर्स तिने खरेदी केल्याचे पुढे आले आहे. पूजाचा पती विशांत अद्याप फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.