कोची – भारतात पुरुषसत्ताक संस्कृती आहे, असे म्हटले जाते. महिलांच्या कर्तबगारीने त्यावर अनेकवेळा मातही केली. पण मानसिकता काही जात नाही. या मानसिकतेचा बळी ठरलेली एक महिला आणि तिचा संघर्ष सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. पती आणि सासरच्यांनी घरातून हाकलल्यानंतर केरळमधील या महिलेने संघर्ष केला, त्रास सोसला. आज ही महिला पोलिस अधिकारी म्हणून एका पोलिस स्टेशनचा कार्यभार सांभाळत आहे.
काल्पनिक प्रेरणादायी कथांची खरे तर आवश्यकताच नाही. आपल्या आसपास किंवा जगात घडणाऱ्या सकारात्मक घटनांच्या कथा नोंदवून ठेवल्या तरीही काल्पनिक कथांची गरज पडणार नाही. केरळमधील वर्कला पोलिस स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक पदावर असलेली एनी शिवा हिची कहाणीही अशीच आहे. कॉलेजमध्ये असताना एनीने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केले.
काही दिवसांनी तिला पतीने सोडले आणि सासरच्यांनी घरातून बाहेर काढले. त्यावेळी तिच्या कुशीत सहा महिन्यांचं बाळ होतं. आपल्या समाजातील निष्ठुरतेचे आणखी उदाहरण तरी कुठले द्यावे. घरातून बाहेर पडल्यावर स्वतःच्या नाही पण बाळाच्या पोटासाठी तिला काम करणे आवश्यक होते. तिने रस्त्यावर लिंबू–पाणी विकले, छोटी–मोठी कामं केली. त्यावेळी ती आपल्या आजीच्या घरामागे असलेल्या झोपडीत राहू लागली. घरोघरी जाऊन वस्तू विकण्याचेही काम तिने केले. मात्र कशातच यश येत नव्हते. कसातरी फक्त दिवस पुढे जात होता.
आणि एक दिवस…
या परिस्थितीतही एनीने शिक्षणाशी फारकत घेतली नाही. तिने समाजशास्त्रात पदवी घेतली. २०१४ मध्ये तिरुवअनंतपुरम येथील एका कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला आणि मित्रांच्या मदतीने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली. आणि एक दिवस ती सिव्हिल पोलिस अधिकारी झाली. २०१९ मध्ये तिने आणखी एक परीक्षा देऊन प्रमोशन प्राप्त केले. आता ती वर्कला पोलिस स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक पदावर काम करीत आहे.