मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुमारे 102 कोटी रुपयांच्या खोट्या पावत्या सादर करून 14 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट मिळविणाऱ्या एका व्यक्तीला महाराष्ट्र राज्य जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. तसेच या अधिकाऱ्यांनी मे. सर्मिक्स या कंपनीशी संबंधित असलेल्या पुरवठादारांकडून 8 कोटी रुपयांचा महसूल वसूल करण्यात देखील यश मिळविले. महाराष्ट्र सीजीएसटी विभागाने कर-चुकवेगिरी करणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध सुरु केलेल्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून केलेल्या या कारवाईत मे. सर्मिक्स या कंपनीच्या मालकाला 102 कोटी रुपयांच्या खोट्या पावत्या सादर करून 14 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडीट उत्पन्न करणे, प्राप्त करणे आणि वापरणे या गुन्ह्याखाली अटक केली आहे.
या प्रकरणात आणखी काही घोटाळा झाला आहे का याची खात्री करून घेण्यासाठी तपासणी सुरु आहे. महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मे. सर्मिक्स या कंपनीच्या मालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.राज्य कर विभागाचे उपायुक्त नीलकंठ एस. घोगरे आणि मुंबईच्या अ तपासणी विभागातील राज्य कर विभागाचे सहआयुक्त आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कर विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल सूर्यवंशी यांनी ही संयुक्त कारवाई पार पाडली.
जीएसटी विभागाचे अधिकारी कर चुकवेगिरी करणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी इतर अधिकारी संस्थांसह डेटा अॅनालीटिक साधनांचा वापर करत आहे. करचुकवेगिरी करणाऱ्यांना महाराष्ट्र जीएसटी विभाग कोणत्याही परिस्थितीत कायद्यापासून पळू देणार नाही असा कठोर इशारा या कारवाईद्वारे सर्व घोटाळेबाजांना देण्यात आला आहे.