मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य वस्तू व सेवा कर विभागाने (जीएसटी) ५ कोटी ६४ लाख रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) प्रकरणी एका व्यापारी फर्म मालकास अटक केली आहे.या फर्मने प्रत्यक्ष वस्तू किंवा सेवांची देवाण-घेवाण न करता ITC चा दावा केल्याचे उघड झाले.
फर्मने १६ एप्रिल २०२५ रोजी जीएसटी कायद्यांतर्गत नोंदणी केली असून, तपासादरम्यान १५ कोटी २२ लाख रुपये कोटींचे बनावट टॅक्स क्रेडिट अस्तित्वात नसलेल्या संस्थांमार्फत मिळवले गेले. प्रत्यक्षात कोणतेही वस्तू वा सेवा प्राप्त न होता ४२ लाख रुपयांची इनपुट टॅक्स क्रेडिट अतिरिक्त जीएसटी विवरणात दाखवले गेले. मेसर्स साळवे ट्रेडर्सशी संबंधित नसलेल्या, मुंबईत नोंदणीकृत २७ वेगवेगळ्या कंपन्यांशी जोडलेले कोरे स्वाक्षरी केलेले फॉर्म, कोरी चेकबुक व खरेदी-विक्री बीजके जप्त करण्यात आले.
ही फर्म बनावट दाव्यांद्वारे करचोरी सुलभ करण्यासाठी बनावट बीजक जारी करणाऱ्या व प्रसारित करणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याचे स्पष्ट झाल्याने अटक केली आहे. या प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मुंबई यांनी अंकुश साळवे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत कारवाईत बनावट बीजक व खोट्या उलाढालीविरुद्ध राज्य जीएसटी विभागाच्या विशेष तपास मोहिमेअंतर्गत करण्यात आली. ही कारवाई सहायक राज्यकर आयुक्त सुजीत कक्कड यांच्या नेतृत्वाखाली, संतोष खेडकर, संतोष लोंढे, दीप्ती पिलारे तसेच राज्यकर निरीक्षक व कर सहाय्यकांच्या पथकाने राज्यकर उपआयुक्त यास्मीन अजीम मोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली.
राज्य वस्तू व सेवा कर विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये अकराव्या प्रकरणात अटक करण्यात आली असून करचोरी, बनावट इनवॉईस, खोट्या उलाढाली व बेकायदेशीर ITC विरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. करचोरी विरुद्ध विभागाने मोहीम राबवत आहे.