नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच रायगड मधील मुंबई विभागाच्या केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तालयाच्या, करचोरीविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत काल दोन व्यक्तींना अटक केली. या व्यक्तींनी बोगस कंपन्या तयार करून तसेच वस्तू / सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करताच पावत्या जारी करत, ९ कोटी रुपयांपेक्षा जास्त इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) बेकायदेशीरपणे मिळवले आणि पुढे हस्तांतरित केले होते.
याबाबतीत मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पथकाने या आरोपींद्वारे खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यासाठी आणि ते पुढे हस्तांतरीत करण्यासाठी वापर केला जात असलेल्या बोगस कंपन्याचा शोध घेतला. त्यात त्यांना मेसर्स जैशा मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केलेल्या आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून हे क्रेडिट घेतल्याचे आढळले. मेसर्स जैशा मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपल्या नोंदणीकृत मुख्य पत्त्यावर कार्यरत नसल्याचेही पथकाला आढळून आले, आणि वस्तूंची प्रत्यक्ष आवक किंवा जावक झाली नसल्याचेही त्यातून सिद्ध झाले.
मेसर्स जैशा मेटल्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक, मुकेश देव नारायण तिवारी (रा. नवीन पनवेल) आणि संदीप नन्हेलाल मोदनवाल (रा. डोंबिवली प.) हे दोघेही या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रक्रियेत सक्रिय सहभागी असल्याचेही या पथकाने केलेल्या तपासातून असे समोर आले. त्यानंतर या दोघांनाही केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम, २०१७ च्या कलम 69(1) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. हे गुन्हे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम, २०१७ च्या कलम 132(1)(ब) आणि 132(1)(क) अंतर्गत शिक्षेस पात्र आहेत. दोघांनाही पनवेल मधील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या बनावट पावती रॅकेटमधील इतर लाभार्थी आणि सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.