नवी दिल्ली – देशात रस्ता अपघातात दररोज हजारोंच्या संख्यांनी मृत्यू होतात. रस्ता अपघात टाळण्यासाठी तसेच अपघातातील मृतांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने रस्ते परिवहन महामार्ग मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करताना केंद्रीय रस्ते परिवहन महामार्ग मंत्रालयाने भारतात वाहनचालक आणि रस्ता सुरक्षा तंत्रज्ञानासाठी आयआयटी मद्रास आणि MapmyIndia या डिजिटल तंत्रज्ञान कंपनीशी करार केला आहे. तिघांनी मिळून फ्री-टू-यूज-नेव्हीगेशन अॅपचे अनावरण केले आहे.
रस्त्यावर होणार्या अपघातांबद्दल हे अॅप सुरक्षेचा इशारा देते. या नेव्हीगेशन अॅपद्वारे वाहनचालकांना रस्त्यात येणार्या अपघात प्रवण क्षेत्राची, गतिरोधक, टोकदार वळण, आणि खड्ड्यांसह इतर धोक्याची सूचना आवाज किंवा फोटोद्वारे मिळणार आहे.
MapmyIndia तर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘MOVE’ या नेव्हीगेशन सेवा अॅपने २०२० मध्ये केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर अॅप इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. या सेवेचा वापर दुर्घटनांमध्ये असुरक्षित क्षेत्रे, रस्ते आणि दळणवळणाच्या मुद्द्यांना नकाशावर रिपोर्ट तसेच प्रासारित करण्यासाठी नागरिक आणि अधिकार्यांद्वारे केला जाऊ शकतो. इतर युजर्सच्या मदतीने डेटाचे विश्लेषण आयआयटी मद्रास आणि MapmyIndia कडून केले जाणार आहे. भविष्यात रस्त्यांची स्थितीचा अभ्यास करण्यासाठी सरकारकडून या अॅपचा वापर केला जाणार आहे.
जागतिक बँकेकडून निधी मिळालेल्या आणि आयआयटी मद्रासने संशोधित केलेल्या डेटा-ड्रिव्हन रोड सेफ्टी मॉडेलला रस्ता मंत्रालयाने गेल्या महिन्यात अधिकृतरित्या स्वीकारले होते. रस्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच आपत्कालीन प्रतिसाद त्वरित मिळण्याच्या सुविधेत सुधारणा घडवून आणण्यासाठी ३२ हून अधिक राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांकडून संस्थेद्वारे विकसित केलेल्या रस्ता दुर्घटना डेटाबेस मॉडेलचा वापर केला जाणार आहे.
२०३० सालापर्यंत रस्ता अपघातात होणार्या मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी तसेत रस्ते वाहतूक दुर्घटनांमध्ये एकही मृत्यू होऊ नये या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याच्या दिशेने एक नकाशा विकसित करण्यासाठी आयआयटीच्या पथकाने विविध राज्य सरकारांसोबत करार केला आहे. रस्ता सुरक्षेसाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक उपाययोजना करत आहेत.