मजा आणि नवोन्मेषाच्या जोडीने शिक्षण
परिचय
इनोव्हेट2एज्युकेट हँडहेल्ड डिव्हाईस चॅलेंज ही रंजक स्पर्धा असून मुलांच्या शिकण्याचा अनुभवात बदल घडविणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. हा पहिल्या क्रिएट इन इंडिया स्पर्धेचा एक भाग असून WAVES (जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद ) अंतर्गत साजरा करण्यात येत आहे. पुढील चार प्रमुख घटक स्पर्धेच्या केंद्रस्थानी असतील: प्रसारण आणि इन्फोटेनमेंट, AVGC-XR, डिजिटल मीडिया आणि नवोन्मेष व चित्रपट. इनोव्हेट2एज्युकेट स्पर्धा WAVES च्या दुसऱ्या स्तंभाशी सुसंगत असून ती AVGC-XR (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेम्स, कॉमिक्स आणि ऑगमेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी आणि मेटाव्हर्स यासारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान) वर आधारित आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने द इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटी (IDGS) च्या सहकार्याने याचे आयोजन केले असून यामध्ये Hack2Skill इनोव्हेशन पार्टनर तर ICT अकादमी स्किलिंग पार्टनर आहे. तीन आंतरराष्ट्रीय सहभागींसह एकूण 334 उमेदवारांनी आतापर्यंत स्पर्धेसाठी नाव नोंदणी केली आहे.
उद्देश
शैक्षणिक हँडहेल्ड उपकरणाची प्रतिकृती तयार करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत, शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, डिझाइनर, अभियंते आणि नवोन्मेषकांना सहभागी होता येईल:
- यामुळे गणित शिकण्यात मुले सहभागी होऊ शकतील
- कोड्यांच्या माध्यमातून उदाहरणे सोडवण्यास प्रोत्साहन मिळेल
- संवादात्मक कंटेंटच्या साथीने आकलन कौशल्यात वाढ होईल
- व्यापक समुहाला परवडेल आणि सहज उपलब्ध होऊ शकेल.

स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना
स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये शिक्षण आणि मनोरंजन यांची सांगड घालणारी नावीन्यपूर्ण हॅन्डहेल्ड उपकरणे डिझाइन करण्यावर भर आहे. स्पर्धकांनी पुढील प्रमुख मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे:

स्पर्धेचे टप्पे
स्पर्धेचे तीन प्रमुख टप्पे असतील. प्रत्येक संकल्पनेपासून अंतिम उत्पादनापर्यंत सहभागींना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने त्यांची आखणी करण्यात आली आहे. प्रारंभिक कल्पना सादर करण्यापासून ते तयार प्रोटोटाइप सादर करण्यापर्यंतच्या प्रक्रियेची थोडक्यात माहिती.
नावनोंदणीची प्रक्रिया:
नावनोंदणीसाठी पुढील तीन पायऱ्यांचा अवलंब करा:
पहिली पायरी: ऑनलाईन नोंदणी
नोंदणी प्रक्रियेची मुदत 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपेल (23:59 IST)
दुसरी पायरी: तुमची कल्पना दाखल करा
तपशीलवार रेखाटने, वर्णनासह मुख्य वैशिष्ट्ये नमूद करा.
तिसरी पायरी: तुमचा प्रोटोटाइप विकसित करून सादर करा

निवडलेल्या सहभागींना वर्किंग प्रोटोटाइप तयार करण्यासाठी आणि तो सादर करण्यासाठी आमंत्रित केले जाईल.
मूल्यमापनाचे निकष
सहभागींनी सादर केलेल्या प्रतिकृतींचे मूल्यमापन पुढील निकषांच्या आधारे केले जाईल:
- नावीन्यपूर्णता: उपकरणाचे डिझाइन आणि आशयाच्या संकल्पनेची अस्सलता आणि सर्जनशीलता.
- शैक्षणिक मूल्य: गणित शिकवण्यासाठी आणि आकलन कौशल्य वाढविण्याच्या अनुषंगाने परिणामकारकता.
- वापरकर्ता अनुभव: मुलांच्या दृष्टीने उपकरण कितपत आकर्षक आणि वापरकर्ता-स्नेही आहे.
- कमी खर्चिक: उपकरण परवडणाऱ्या किमतीत तयार करण्याची शक्यता.
- टिकाऊपणा आणि डिझाइन: डिझाइनचा व्यवहार्य वापर आणि दणकटपणा.
पारितोषिके
इनोव्हेट2एज्युकेट स्पर्धेत सर्जनशीलता आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. विजेत्यांना रोख बक्षिसे, प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी सहाय्य तसेच प्रमुख कार्यक्रमांमध्ये त्यांचे डिझाइन प्रदर्शित करण्याची संधी मिळेल.
- पहिल्या तीन डिझाइन्सना रोख बक्षिसे दिली जातील.
- प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी सहाय्य: विजेत्यांना प्रोटोटाइप अधिक सफाईदार करण्यास आणि तयार करण्यास सहाय्य केले जाईल.
- प्रदर्शनाची संधी: स्पर्धेत बक्षीसपात्र ठरलेले डिझाइन प्रमुख IDGS इव्हेंटमध्ये प्रदर्शित केले जाईल, त्या माध्यमातून ते संभाव्य गुंतवणूकदार आणि उत्पादकांना दाखवण्याची संधी मिळेल.
संदर्भ:
- https://wavesindia.org/challenges-2025
- https://gamingsociety.in/innovate2Educate-competition/innovate2Educate-competition.php