मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काही ज्येष्ठ नागरिक हे वृद्धाश्रमात किंवा आधार आश्रमात राहतात, परंतु तरीही त्यांचे एकाकी पण कमी होत नाही. यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सहवेदनेची जाणीव या निकषांवर पारख करून निवडलेल्या तरुण, सुशिक्षित पदवीधरांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना खरीखुरी, अर्थपूर्ण सोबत मिळवून देणारा नवा स्टार्ट अप सुरु करण्यात आला आहे. या “गुडफेलोज”या युवा स्टार्ट-अपचा शुभारंभ रतन टाटा यांच्या उपस्थितीत झाला आहे.
या स्टार्ट-अपमधील गुंतवणुकीविषयी बोलताना इमेरिटस ऑफ द इन्व्हेस्टमेंटचे अध्यक्ष रतन एन. टाटा म्हणाले की, गुडफेलोजने दोन पिढ्यांमध्ये निर्माण केलेला स्नेहबंध अतिशय अर्थपूर्ण आहे आणि भारतातील एक महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नावर उत्तर शोधण्यास त्यामुळे मदत होत आहे. या गुंतवणुकीमुळे गुडफेलोजची युवा टीम आणखी विस्तारण्यास मदत होईल, अशी मला आशा आहे. आपल्या संपूर्ण कार्यपद्धतीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी गुडफेलोजने 6 महिन्यांचा अवधी घेतला होता. त्यानंतर आता ही सेवा मुंबईमध्ये सुरु होणार आहे. यानंतर पुणे, चेन्नई आणि बेंगळुरू या शहरांना लक्ष्य केले जाणार आहे. चाचणी दरम्यान गुडफेलोजला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या दरम्यान गुडफेलोजमध्ये रुजू होण्यास इच्छुक असलेल्या 800 हून अधिक युवा पदवीधरांचे अर्ज कंपनीकडे आले होते, यातून निवडण्यात आलेल्या 20 जणांच्या तुकडीने ज्येष्ठ नागरिकांना सोबत पुरविली.
विशेष म्हणजे टीमच्या अनुभवानुसार गुडफेलोजचे ग्रॅण्डपाल्स अर्थात आजी-आजोबांशी तयार होणारे ऋणानुबंध, केवळ दिखाव्यापुरते नाहीत. तर खरोखरीचे आणि अर्थपूर्ण असावेत याची खबरदारी घेणे आव्हानात्मक पण तितकेच समाधानकारक होते, असे कंपनीच्या टीमचे म्हणणे आहे. यासाठी सर्वोत्तम पदवीधर निवडण्यासाठी तपासणीच्या अनेक फे-या तसेच कंपनीतर्फे घेण्यात येणा-या काही सायकोमेट्रिक चाचण्या गरजेच्या असतात.
गुडफेलोजद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांबद्दल सांगायचे तर, या स्टार्टअपच्या माध्यमातून एखाद्या नातवंडाकडून आजी-आजोबांसाठी केल्या जातील अशा सर्व गोष्टींचा त्यात समावेश आहे. भारतामध्ये जवळ-जवळ 1.5 कोटी ज्येष्ठ नागरिक एकतर जोडीदार गमावल्याने किंवा नोकरीच्या अटळ गरजेपोटी कुटुंब इतरत्र स्थलांतरीत झाल्याने एकट्याने आयुष्य कंठत आहेत. काहींसाठी त्याचा अर्थ एकत्र बसून चित्रपट पाहणे असा असतो, काहींसाठी जुन्या दिवसांतल्या आठवणी सांगत बसणे, चालायला जाणे म्हणजे सोबत असते तर काही जणांना अगदी काही न करता केवळ सोबत कुणाचातरी वावर असणे पुरेसे असते आणि आम्ही या सर्व गरजा लक्षात घेतो. गुडफेलोजबरोबर या ग्रॅण्डपाल्सचे ऋणानुबंध किती स्वाभाविकपणे साकारत गेले, हे आम्ही चाचण्यांमध्ये पाहिले.
टाटा यांनी या व्यवसायामध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे या संकल्पनेप्रती असलेल्या आमच्या बांधिलकीला मिळालेले प्रचंड मोठे प्रोत्साहन आहे. याशिवाय गुडफेलोजतर्फे दर महिन्याला काही मासिक उपक्रमही आयोजित केले जातील, जिथे ग्रॅण्डपाल्सना आपल्या गुडफेलोजसह सहभागी होता येईल. त्यामुळे एका वेगळ्या वातावरणात आनंदात घालविलेल्या काही क्षणांमुळे दोघांतील नाते अधिक गहिरे आणि मौजमजेचे बनेल. यामुळे ग्रॅण्डपाल्सना एकमेकांना तसेच इतरही युवा पदवीधरांना भेटता येईल व त्यातून आपण एका समुदायाया भाग असल्याची भावना निर्माण होईल.
गुडफेलोजची व्यवसायपद्धती प्रीमियम सबस्क्रिप्शन मॉडेलवर आधारित आहे. पहिल्या महिन्याची सेवा नि:शुल्क असेल, या कालावधीमध्ये ग्रॅण्डपाल्सना ही सेवा अनुभवता यावी इतकेच त्यामागचे लक्ष्य आहे, कारण प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय ही संकल्पना लक्षात येणे कठीण आहे. दुस-या महिन्यापासून लहानसे सदस्यत्व शुल्क आकारण्यात येईल. पेन्शनधारकांच्या आर्थिक मर्यादा लक्षात घेऊन हे शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. हे शुल्क दोन महत्त्वाच्या कारणांसाठी आकाराले जात आहे.
गुडफेलोजने सहानुभाव आणि वृद्धांविषयीचा कळवळा या निकषांवर पदवीधरांची निवड केली असली तरीही ज्येष्ठांसाठी आपली सर्वोत्तम सेवा पुरवत स्वत:ची आर्थिक सुरक्षितता जपणेही या तरुणांसाठी आवश्यक आहे. त्यांचा मान राखला जावा व हा व्यवसाय निवडण्याचा सुयोग्य मोबदला त्यांना देता यासाठी ही सेवा सशुल्क ठेवण्यात आली आहे. यामुळे निवडलेले गुडफेलोज टिकून राहतील, त्यांना चांगल्या प्रकारे तयार करता येईल व समाजऋण फेडताना त्यांना आपली कारकिर्दही घडवता येईल.
सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना वेळ असेल तेव्हाच ते उपलब्ध होतात आणि खराखुरा स्नेहबंध निर्माण होण्यासाठी ज्येष्ठांबरोबर पुरेसा वेळ घालविण्याची कुणाचीच तयारी नसते. सुरुवातीची उर्मी संपली की स्वयंसेवक निघून जातात व त्याचा ज्येष्ठांच्या मनावर गहिरा आघात होतो. ज्येष्ठ नागरिकांना thegoodfellows.in येथे साइन-अप करून किंवा ८७७९५२४३०७ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ही सेवा मिळविता येईल.
गुडफेलोजकडून नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांना अल्पकालीन इंटर्नशीप तसेच पूर्णवेळ नोकरीचा पर्याय दिला जातो. यामुळे त्यांना आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीमधून मिळालेले ज्ञान या क्षेत्रात वापरता येते व आपण करत असलेल्या कामाचे समाधान मिळते. या पदवीधरांना या सोबतीची संकल्पना तयार करण्याची, नाते तयार करण्याची आणि या नाते आपलेसे करण्याची स्वायत्तता दिली जाते.
नजिकच्या भविष्यामध्ये गुडफेलोजद्वारे प्रवासातील सोबतीही पुरविले जाणार आहेत. सुरक्षिततेच्या कारणापायी किंवा सोबत नसल्याने प्रवास करणे टाळणा-या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरू शकेल. अशाच प्रकारच्या किंवा अधिक खडतर आव्हानांचा सामना करणा-या दिव्यांग समुदायातील व्यक्तींनाही सेवेच्या कक्षेमध्ये सामावून घेण्याची कंपनीची योजना आहे.
Initiative Ratan Tata New Startup Senior Citizen Service
The Good Fellows Mumbai Grand Parents Grand Children Friendship