त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – श्रावणातील चौथ्या आणी शेवटच्या सोमवारी हजारो भाविकांनी आद्य ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रविवारी श्रावण वद्य एकादशी होती. त्यामुळे एकादशी व सोमवारचे पुण्य पदरात पाडुन घेण्यासाठी रविवारी सायंकाळ पासूनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला भाविकांची गर्दी सुरु झाली. अभंग गात, बम बम भोले चा जयघोष करीत भाविक प्रदक्षिणेला जात होते. पन्नास हजारांपेक्षा अधिक भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली. पहाटे पासूनच भगवान त्र्यंबकेश्र्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पूर्व दरवाजातून धर्मदर्शन तर मंदिराच्या उत्तर दरवाजातून पेड दर्शन व नेमुन दिलेल्या वेळेत स्थानिक नागरीकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते. धर्मदर्शन व देणगी दर्शनासाठीही मोठी रांग लागली होती. खासगी वाहनांना याही सोमवारी गावात प्रवेशबंदी होती त्यामुळे श्रीसंत गजानन महाराज चौकात नाशिक बाजुकडे व जव्हार बाजुकडे रस्त्याच्या दुतर्फा खाजगी वाहनांची गर्दी झाली होती.
दुपारी ठिक तीन वाजता भगवान त्र्यंबकेश्वराच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पानाफुलांनी सजविलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा विराजमान करण्यात आला. बॅण्डच्या तालावर वाजतगाजत पालखी कुशावर्त तिर्थावर आणण्यात आली. या ठिकाणी एक तास भगवान त्र्यंबकेश्वराची पुजा अभिषेक करण्यात आला. वंशपरंपरागत पुजारी वेदमुर्ती चिन्मय फडके यांनी पुजाविधी पार पाडला तर शागिर्द म्हणुन राधेय कुलकर्णी, यज्ञेश कावनईकर, संजय दिघे, कुणाल लोहगावकर, गंधर्व वाडेकर यांनी सेवा बजावली. आरती झाल्यावर पुन्हा मुखवटा पालखीत विराजमान करून पालखी मंदिरात आणण्यात आली. भगवान त्र्यंबकराजाचा सुवर्ण मुखवटा काही क्षण सभामंडपातील कासवावर ठेवण्यात आला. यावेळी भाविकांनी बम बम भोलेचा जयघोष केला. यानंतर मुखवटा परत देवस्थानच्या कार्यालयात नेण्यात आला. याठिकाणी भगवान त्र्यंबकेश्वराचा सुवर्ण मुखवटा व रत्नजडीत मुकुटाचे दर्शन भाविकांना घडविण्यात आले. यादरम्यान त्र्यंबकेश्वराचे प्रदोषपुष्प पुजक वेदमुर्ती डाॅ. ओमकार उल्हास आराधी यांनी गर्भगृहात प्रदोषपुजा संपन्न केली. भगवान त्र्यंबकराजाच्या रजत मुखवट्यास उत्कृष्ठ शृंगार करुन आरती केली. या सोहळ्यात मंदिर संस्थानचे विश्वस्त डाॅ. श्रिया देवचके, स्वप्निल शेलार, पुरुषोत्तम कडलग यांचे सह देवस्थान ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी, शेकडो भाविक सामील झाले होते. कुशावर्त तिर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. जवळपास एक लाखाच्या आसपास भाविकांनी आज येथे हजेरी लावली.
पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पो. उप अधिक्षक कविता फडतरे, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक बिपीन शेवाळे व सहकार्यांनी तसेच सुरक्षा पर्यवेक्षक योगिता टोके, अजय गायकवाड व महाराष्ट्र सुरक्षा बल चे महिला कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांनी मोठा बंदोबस्त लावला होता.
Trimbakeshwar 4th Shravan Monday huge crowd of Shiva devotees