मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत बनावट कंपनी स्थापन करणाऱ्या व बनावट देयक देणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असल्याची माहिती, राज्यकर उपआयुक्त(जनसंपर्क) यांच्या कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या अन्वेषण भेटीत मे. निमा वर्ल्ड प्रा. लि. या व्यापाऱ्याने बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी केली असल्याचे आढळून आले. तसेच या व्यापाऱ्याशी संबंधित मुकुंद अर्जुन झा यांनी अन्य काही बनावट कंपन्या स्थापन करुन बोगस करदात्यांकडून १९ कोटी रुपयांची बनावट बजावट (इनपूट टॅक्स क्रेडीट) घेतल्यामुळे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने मुकुंद अर्जुन झा याला ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी विशेष मोहिमेअंतर्गत अटक केली. मा. महादंडाधिकारी न्यायालय, मुंबई यांनी मुकुंद अर्जुन झा यांस १३ सप्टेंबर २०२३ पर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पुढील तपासात संदीप चंद्रभूषण शुक्ला, संचालक याचा सहभाग निदर्शनास आला असून त्याने बनावट कंपन्या स्थापन करुन रु. ९.१८ कोटी रुपयांची बनावट वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवली. तसेच रु ९.१९ कोटी रुपयांच्या कराची बनावट विक्री देयके दिली. या प्रकरणात बोगस करदात्यांकडून बनावट वजावट (इनपूट टॅक्स क्रेडीट) घेतल्यामुळे व बनावट विक्री बिले दिल्याने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा, २०१७ या कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन झाले असल्याने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने संदीप शुक्ला, यास ८ सप्टेंबर २०२३ रोजी विशेष मोहिमेअंतर्गत अटक केली. मा. महादंडाधिकारी न्यायालय, मुंबई यांनी शुक्ला यांस दिनांक १३ सप्टेंबर २०२३ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
खोट्या कंपन्या स्थापन करुन, खोटी बिले देऊन तसेच कोणत्याही वस्तू व सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता, खोटे व्यवहार, विवरणपत्रात नमूद करुन करचोरी करणाऱ्या तसेच पुढील खरेदीदार व्यापाऱ्यांना खोटी कर वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) हस्तांतरित करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवणे व अशा व्यवहारास प्रतिबंध घालण्याच्या मोहिमेअंतर्गत सन २०२३-२४ मध्ये आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आलेली आहे.
fake bills by setting up fake companies; Two persons arrested