दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयात वकीली करणाऱ्या महिला वकिलाची तिच्याच पतीनेच हत्या केल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे. उच्चशिक्षित कुटुंबात झालेल्या या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या रविवारी नोएडा सेक्टर ३० येथील डी-४० कोठीमध्ये राहणाऱ्या रेणू सिन्हा यांचा रक्ताने माखलेला मृतदेह घराच्या बाथरूममध्ये सापडला होता.
६१ वर्षीय रेणू सिन्हा या सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होत्या. रेणू यांचा खून झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. पोलिस जेव्हा बाथरूममध्ये पोहोचले तेव्हा तेथील दृश्य भयावह होते. कारण, रेणू यांचा मृतदेह रक्ताने माखलेला होता आणि सगळीकडे रक्त पसरले होते. हा प्रकार पाहताच घरात एकच गोंधळ माजला. पोलिसांनाही हा प्रकार पाहून खूप विचित्र वाटले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. रेणू यांच्या पतीने हा हल्ला केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. हत्येनंतर रेणू यांचा पती फरार होता. पोलीस त्याचा शोध घेण्यात व्यस्त होते. त्याचा कुठेही पत्ता लागत नव्हता. अशा स्थितीत रेणू यांच्या पतीवरील संशय बळावत होता.
यादरम्यान, काल रात्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. खून झाल्यापासून आरोपी पती घराच्या स्टोअर रूममध्येच लपून बसला होता. रात्री ३ वाजता पोलिसांनी त्याला बाहेर काढले. गेल्या २४ तासांपासून तो स्टोअर रूममध्ये लपून बसल्याचे सांगण्यात आले. आता पोलीस त्याची चौकशी करत आहेत. काल घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी रेणूचा अतिरक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. तिच्या मृत्यूसाठी कुटुंबीयांनी रेणूच्या पतीला जबाबदार धरले आहे. पोलिस पथकाने लोकांचे जबाब घेतले असून घटनास्थळावरून पुरावेही गोळा केले आहेत. शिवाय गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
घरावरून सुरू होता वाद
पती-पत्नीमध्ये घराबाबत वाद होता, यातूनच त्याने ही हत्या केली. या दोघांमध्ये बराच काळ मतभेद होते. रेणू फोन उचलत नसल्याची माहिती या महिलेच्या भावाने रविवारी पोलिसांना दिली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरवाजा तोडल्यानंतर पथकाने आत जाऊन तपासणी केली असता घराच्या बाथरूममध्ये रेणूचा मृतदेह पडलेला आढळून आला. रेणूच्या कानाजवळ जखमेच्या खुणा होत्या. त्यानंतर पोलिसांनी रेणू यांच्या पतीला फोन केला पण त्याचा फोन बंद होता.
A woman lawyer of the Supreme Court was killed by her husband