बीजिंग – जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी जास्त होत असतानाच भारतासह बहुतांश देशांमध्ये लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यासाठी नानाविध प्रकारच्या लशींचा वापर करण्यात येत आहे. त्यातच नवनवीन संशोधन करून वेगवेगळ्या लशी बाजारात दाखल होत आहेत. आता चिनी संशोधकांनी आणखी एक नवीनच लस शोधून काढली आहे. त्यामुळे अॅन्टीबॉडी चक्क 300 पट वाढतात, असा दावा करण्यात येत आहे. खास म्हणजे, ही लस चक्क श्वासाद्वारे घ्यायची आहे.
एका चायनीज फार्मास्युटिकल कंपनीने केलेल्या प्रयोगशाळेच्या अभ्यासानुसार, अँटी-कोरोना व्हायरस लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी घेतल्यास हा बूस्टर डोस अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. चीनी संशोधकांच्या मते, यामुळे अँटीबॉडीजची (प्रतिपिंडांची) पातळी प्रचंड वाढू शकते. तसेच रुग्णाला श्वासही चांगला घेता येतो.
चीनच्या कॅनसिनो बायोलॉजिक्सने श्वास घेण्यायोग्य (इनहेलेबल) कोरोना लस विकसित केली आहे. या कंपनीचा दावा आहे की, श्वसनावाटे ही लस दिली जाते. म्हणजे श्वास घेताच लसीचा डोस शरीरात जातो. सदर लस बूस्टर डोस म्हणून घेतली जाते, तेव्हा ती लस अँटीबॉडीजची पातळी 250 ते 300 पट वाढवते. तसेच या चायनीज फार्मास्युटिकल कंपनीने केलेल्या प्रयोगशाळेच्या अभ्यासानुसार, अँटी-कोरोनाव्हायरस लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी घेतल्यास हा बूस्टर डोस अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.
जगभरातील अनेक देशात कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वीच तो सर्वप्रथम चीनमध्ये पसरला होता, याचा पहिला रुग्ण डिसेंबर 2019 मध्ये वुहानमध्ये नोंदवण्यात आला होता. तर आता चीनी संशोधकाच्या अभ्यासानुसार, लशीच्या दोन डोसनंतर सहा महिन्यांनी एरोसोल म्हणून इनहेल्ड एडेनो व्हायरस टाइप -5 वेक्टर-आधारित कोविड -19 लस घेणे सुरक्षित आहे. दरम्यान, एका आकडेवारीवरून असे दिसून आले की, एमआरएनए या लशींचे बूस्टर डोस पाश्चात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आहेत.