नाशिक/पुणे/मुंबई (टीम इंडिया दर्पण) – सध्या सणासुदीचे दिवस असून फळभाज्या आणि पालेभाज्या यांचे भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे तोंडचे पाणी पळाले आहे. त्यात गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कोथिंबीरची जुडी चक्क सुमारे १८० ते २०० रुपयाला मिळत असून पालक, मेथीच्या जुडीचा दरही सुमारे ५० ते ६० रुपये इतका आहे. बाजारात आवक घटल्याने तसेच मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सतत चार महिने पाऊस कोसळत होता. सहाजिकच श्रावण महिना, गणेशोत्सव, पितृपक्ष या काळात सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. सध्या नवरात्र उत्सव सुरू असून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. तरीही भाज्यांचे दर कमी झालेले नाहीत. याला कारण म्हणजे आवक घटली असून सणासुदीमुळे मागणी वाढली आहे. नाशिक मधून दररोज मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि त्या परिसरातील उपनगरांमध्ये सुमारे ३० ते ४० ट्रक भाजीपाला रवाना होतो. परंतु सध्या सुमारे १५ ते २० ट्रकच भाजीपाला जात आहे. तसेच गुजरातला देखील कमी प्रमाणात भाजीपाला पाठविला जात आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
भाज्यांचे दर साधारणतः दसऱ्यापर्यंत असेच कायम राहतील असे दिसून येते. परंतु दिवाळीच्या दरम्यान भाज्यांचे दर कमी होतील, असा अंदाज शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कारण या काळात भाजीपाल्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. दिंडोरी, चांदवड, निफाड, सिन्नर, पेठ, त्रंबक या भागातील तसेच नाशिक तालुक्यामधील शेतकरी बांधवांकडील भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत असतो. तेथून विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करत किरकोळ बाजारात विक्री केली जाते. नियमितपेक्षा सध्या निम्मीच आवक सध्या होत आहे. त्यामुळे कोणत्याही भाजीचे दर साधारणतः १२५ ते १५० रुपये किलोपर्यंत जात आहेत.
बाजारात लाल भोपळा, दुधी भोपळा, भेंडी, कोबी, फ्लॉवर, शिमला, गिलके, दोडके, बटाटे, वांगी अशा नेहमीच्या भाज्यांचे भाव वाढलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे गेल्या तीन-चार दिवसांपासून कोथिंबीर आवक घटल्याने कोथिंबीर जुडीला प्रचंड भाव मिळत आहे. त्याचबरोबर इतर भाजीपाला दर देखील वाढले आहेत. आगामी काळात भाजीपाल्याचे दर अजून वाढणार किंवा असेच चढे असल्याची सांगण्यात येत आहे. त्यातच मेथी, कोथिंबीर, शेपू अशा अनेक पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.
सध्या किरकोळ बाजारात अद्रक ८० रुपये किलो, लवंगी मिरची १०० रुपये किलो, शेवगा ७० रुपये किलो, ढेमसे ६० रुपये किलो, काकडी २० ते ३० रुपये किलो, टोमॅटो २० ते ३० रुपये किलो, कोबी गड्डा २० ते २५ रुपये, कोथिंबीर २०० रुपये जुडी, कारले ५० ते ६० रुपये किलो, भोपळा ६० ते ७० रुपये किलो, फ्लॉवर १५० रुपये किलो असे दर आहेत. यंदा पावसामुळे पालेभाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बाजारातील आवक कमी झाली, असे भाजीविक्रेत्यांनी सांगितले. सततच्या पावसाचा फळांनाही फटका बसलेला आहे. सततच्या पावसाच्या तडाख्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारात फळभाज्यांची आवक कमी होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
Inflation Vegetables rate Hike Market Supply Demand