नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशात प्रत्येक वस्तूंच्या किमती वाढत असल्याने सर्वामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. देशातील अनेक शहरात लिंबानंतर आता टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. मुंबई आणि चेन्नईसारख्या महानगरांमध्ये टोमॅटोचे भाव दुप्पट झाले आहेत. मुंबई आणि चेन्नईमध्ये टोमॅटोचे भाव ७० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, दिल्ली वगळून इतर महानगरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव एक महिन्याच्या तुलनेत ७७ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.
ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार १ जून रोजी कोलकातामध्ये टोमॅटोचे किरकोळ भाव ७७ रुपये प्रतिकिलो झाले आहेत. एक महिन्यापूर्वी टोमॅटोचे भाव ३० रुपये किलो होते. मुंबईमध्ये एप्रिलमध्ये ३६ रुपये किलोप्रमाणे असणारे टोमॅटोचे किरकोळ भाव १ जून रोजी वाढून ७४ रुपये किलो झाले आहेत. चेन्नईमध्ये टोमॅटोचे भाव एप्रिलमध्ये ३८ रुपये किलो होते, आता ते वाढून ६७ रुपये किलो झाले आहेत.
पीटीआयच्या वृत्तानुसार, राजधानी दिल्लीमध्ये किरकोळ टोमॅटोचे भाव एप्रिलमध्ये ३० रुपये किलो होते. १ जूनला वाढून ३९ रुपये प्रतिकिलो झाले आहेत. त्याशिवाय पोर्ट ब्लेअर, शिलाँग, कोट्टायम आणि पथानामथिट्टा येथे टोमॅटोचे भाव १०० रुपयांहून अधिक झाले आहेत. टोमॅटो उत्पादक आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात टोमॅटोचे भाव वेगाने वाढत आहेत. वेगवेगळ्या शहरांमध्ये ५० रुपयांपासून ते १०० रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहोचले आहेत. टोमॅटो उत्पादक राज्यांमधून पुरवठा घटल्याने किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव वाढले आहेत, असे तज्ज्ञ सांगतात.