इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अन्नपदार्थ आणि इंधनाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असली तरी वेतनामध्ये वाढ होत नसल्याची सत्यस्थिती आहे. त्यामुळे वाढत्या महागाईमुळे जनतेच्या खिशावरचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे जगभरात व्यापक निषेध आणि संप करण्यात येत आहेत. पाकिस्तानातील विरोधी पक्ष, झिम्बाब्वेमधील परिचारिका, बेल्जियममधील कामगार, ब्रिटनमधील रेल्वे कर्मचारी, इक्वाडोरमधील स्थानिक, अमेरिकेतील पायलट आणि काही युरोपीय विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनीही वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर निदर्शने केली.
श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजकीय अस्थिरतेनंतर देशाची आर्थिक घसरण जाहीर केली. युक्रेनमध्ये रशियाने सुरू केलेल्या युद्धामुळे ऊर्जेची किंमत वाढली आहेत. खते, धान्य आणि खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाढत्या किमतींमुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी रुंदावण्याचा धोका आहे. ऑक्सफॅम या दारिद्र्यविरोधी संस्थेच्या असमानता धोरणाचे प्रमुख मॅट ग्रेनॉर म्हणाले, “श्रीमंतांना हेदेखील माहित नाही की ब्रेडच्या एका पॅकेटची किंमत किती आहे. जागतिक महामारी कोरोना विषाणूमुळे जगभरात आर्थिक विषमता वाढली आहे. येत्या काळात त्याचे आणखी परिणाम पहायला मिळतील. ही परिस्थिती सामान्यांची चिंता वाढवणारी आहे.”
दक्षिण कोरियातील ट्रकचालकांनीदेखील आठ दिवसांचा संप गेल्या आठवड्यात केला. इंधनाच्या वाढत्या किमती हे त्यामागील कारण होते. किमान वेतन हमी देण्याची मागणी त्यांनी या संपातून केली. काही महिन्यांपूर्वी स्पेनमध्येही ट्रक कामगार संपावर गेले होते. वाढत्या इंधन आणि अन्नाच्या किमतींवरून निदर्शने हिंसक झाल्यानंतर एप्रिलमध्ये पेरूने कर्फ्यू लागू केल्याची घटनाही घडली होती. एकूणच वाढत्या महागाईमुळे जगभरात सामान्य माणूस हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
inflation rising salary hike agitation various countries