नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – महागाईवर उपाययोजना म्हणून गव्हाच्या निर्यातीवर अंकुश ठेवल्यानंतर निर्यातदारांनी गव्हाच्या पिठाची निर्यात वाढवली. त्यानंतर सध्या सरकार तांदळाच्या पिठाच्या निर्यातीतील असामान्य वाढ रोखण्यासाठी उपाययोजना करत आहे. कारण गेल्या पाच दिवसांत तांदळाच्या निर्यातीत कमालीची वाढ झाली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अनेक धान्यानंतर आता तांदूळ महाग होण्याची पाळी आली आहे. अशी भीती भात व्यवसायाशी संबंधित नागरिकांनी व्यक्त केली आहे. गहू, ओट्स, इतर काही तृणधान्ये, साखर, खाद्यतेल आणि मांस यांच्या महागाईने जग आधीच हैराण झाले आहे. आता संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) खुलासा केला आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाची किंमत गेल्या महिन्यात १२ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तांदूळ सातत्याने महाग होत आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते, कोरोना महामारी आणि त्यानंतरच्या युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे खते आणि इंधन महाग झाले आहे. याचा परिणाम खाद्यपदार्थांच्या किमतीवर होत आहे. याशिवाय काही देशांनी तृणधान्ये आणि खाद्यतेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्याचा परिणाम जागतिक बाजारातील भावावरही झाला आहे.
तज्ज्ञांच्या मते, जगात तांदळाचे उत्पादन वाजवी पातळीवर आहे. मात्र गव्हाच्या दरात वाढ झाल्याने तांदळाची मागणी वाढली आहे. जपानी गुंतवणूक बँक नोमुराच्या मुख्य अर्थतज्ज्ञ सोनल वर्मा यांनी सांगितले की, आम्हाला तांदळाच्या किमतीवर लक्ष ठेवावे लागेल. गव्हाच्या किमतीमुळे मोठ्या प्रमाणात लोकांनी आपल्या आहारात तांदळाचे प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे सध्याच्या साठ्याच्या तुलनेत तांदळाची मागणी वाढली आहे.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर गव्हाचे भाव वाढले आहेत. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश गव्हाच्या सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून तेथून होणाऱ्या निर्यातीत लक्षणीय घट झाली आहे. गेल्या आठवड्यात त्याची किंमत चार टक्क्यांनी वाढली. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत आज जागतिक बाजारपेठेत गव्हाचा भाव दीडपट जास्त आहे.
तांदळाच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर, थायलंड आणि व्हिएतनाम त्यांच्या तांदूळ निर्यातीच्या किंमती वाढवण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यात, एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, तांदूळ व्यापारी सध्या भारतातून मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी करत आहेत.
वॉशिंग्टनस्थित संशोधन संस्थेतील फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ संशोधक डेव्हिड लेबोर्डे यांनी सीएनबीसीला सांगितले की, “मला सध्या सर्वात जास्त काळजी वाटते ती म्हणजे भारत पुढील काही आठवड्यांत तांदळाची निर्यात थांबवू शकतो.”
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आकडेवारीनुसार जगात तांदूळ उत्पादनात चीन पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंडोनेशिया तिसऱ्या, बांगलादेश चौथ्या, व्हिएतनाम पाचव्या आणि थायलंड सहाव्या स्थानावर आहे. परंतु तांदूळ महागाईचा सर्वात वाईट परिणाम आशियावर होईल, कारण येथे तांदूळ सर्वाधिक वापरला जातो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटचे दक्षिण आशियाचे प्रादेशिक प्रतिनिधी नफीस मियां म्हणाले की, ‘पूर्व तिमोर, लाओस, कंबोडिया आणि इंडोनेशिया यांसारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. तेथील लोक मोठ्या संख्येने अन्न असुरक्षिततेचे बळी आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत तांदूळ महाग झाला तर त्याचा त्यांच्यावर खूप वाईट परिणाम होतो.
बांगलादेशकडून तांदळावरील आयात शुल्क 62.5 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर आणण्याचे सांगितले जात आहे. 22 जून रोजी, बांगलादेशने 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत बिगर-बासमती तांदूळ आयात करण्यास परवानगी देणारी अधिसूचना जारी केली. बांगलादेशच्या या निर्णयानंतर अवघ्या पाच दिवसांत भारतीय बिगर बासमती तांदळाची किंमत 350 डॉलर प्रति टनवरून 360 डॉलर प्रति टन झाली आहे.
विशेष म्हणजे पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून बांगलादेशला भरपूर तांदूळ निर्यात केला जातो, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशच्या या निर्णयानंतर केवळ या तीन राज्यांमध्ये तांदळाच्या किमतीत 20 टक्के वाढ झाली आहे, तर इतर राज्यांमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा 40 टक्के आहे.
Inflation rice rate increased export reasons Bangladesh Connection