मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गहू व तांदळानंतर आता महाग होत असलेल्या डाळींमुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. खरिपात डाळीचा पेरा घटल्याने उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. घटत्या उत्पादनाच्या अंदाजामुळेच डाळींच्या दरात वाढ होत आहे. विशेषत: तूर आणि उडिद डाळींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. महिनाभरात तुरीच्या डाळीच्या दरात 17 टक्के आणि उडिद डाळीच्या दरात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी तुरीला अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने यंदा तुरीच्या पीकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पेरा वाढवला. परिणामी तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. राज्यातील काही बाजारापेठांमध्ये तूर सध्या 100 रुपये किलोच्या आसपास विकली जात आहे. तुरीचे दर वाढल्यामुळे डाळीच्या दरांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या पेरणीच्या आकडेवारीनुसार, मागील वर्षाचा विचार केला तर तूर आणि उडदाच्या क्षेत्रात यंदा घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तूरीखालील क्षेत्र 4.6 टक्क्यांनी कमी झाले आहे, तर उडीदाखालील क्षेत्रात 2 टक्क्यांची घट झाली आहे. प्रमुख तूर उत्पादक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे सध्या शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाकडे कल वाढला आहे. शेतकरी सोयाबीनकडे वळल्यामुळं तुरीचा मोठा साठा नाही. यंदा तूर पेरणी देखील कमी झाली असल्याचे महाराष्ट्रातील कडधान्यांचे आयात करणारे व्यापारी हर्षा राय यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे उडीद पिकाचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. खरीपाचा पेरा यंदा सात लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राने घटला आहे. तूर आणि उडदाच्या लागवडीत मोठी घट झाली आहे. तुरीच्या पेऱ्यात साडेपाच लाख हेक्टर तर उडदाच्या पेऱ्यात सुमारे पावणे दोन लाख हेक्टरनी घट झाली आहे. लागवडीत झालेल्या घटीसोबतच मोठ्या डाळ उत्पादक राज्यात झालेल्या जास्त पावसानंसुद्धा पिकांचं नुकसान झाले आहे.
पेऱ्यात झालेली घट आणि पिकांच्या नुकसानीमुळे डाळींचा काळा बाजार वाढण्याची शक्यता आहे. डाळींचा काळाबाजार आणि साठेबाजीमुळे डाळींच्या किंमती आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारनं दर आठवड्याला डाळींच्या साठ्याची माहिती देण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. डाळींच्या किंमती मोठ्या प्रमाणात नियंत्रणाबाहेर गेल्यास 38 लाख टन डाळींचा साठा खुल्या बाजारात आणण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र, सरकारच्या डाळीच्या साठ्यात मुख्यत: हरभरा डाळीचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सरकारनं संपूर्ण डाळींचा साठा खुल्या बाजारात आणला तरीही तूर आणि उडिद डाळींच्या किंमती नियंत्रणात येवू शकत नाहीत.
डाळींच्या किंमती वाढत असतानाच डाळींच्या निर्यातीत देखील सतत वाढ होत आहे. यावर्षी एप्रिल आणि मेच्या दरम्यान डाळींची निर्यात पाच पटींहून अधिक वाढली आहे. आतापर्यंत 1.9 लाख टन डाळींची निर्यात झाली आहे. डाळींच्या वाढलेल्या निर्यातीमुळेही किंमती वाढत आहेत. खरे म्हणजे भारतात डाळींच्या निर्यातीपेक्षा आयातीचं प्रमाण जास्त आहे. भारत ज्या देशातून डाळी आयात करतो त्या देशात यंदा पिक चांगलं आहे. कॅनडामध्ये तर मटर आणि मसूरचं उत्पादन पन्नास टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. आयात करणाऱ्या देशात उत्पादन वाढल्यानं डाळींच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डाळींची आयात करावी लागणार आहे.
Inflation Pulses Rate Hike Festival Season Government