मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संकटे आले की चहू बाजूने येतात,या म्हणीचा अनुभव सध्या देशातील सर्वसामान्य नागरिक घेत आहेत. इंधनदरवाढीमुळे गरजेच्या वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यात आता देशातील दूरसंचार कंपन्यांकडून पुन्हा एकदा टेरिफमध्ये वाढ करण्यावर विचार सुरू झाला आहे. त्यामुळे आधीच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या ग्राहकांना लवकरच टेरिफ दरवाढीचा जोरदार झटका लागण्याची शक्यता आहे.
निष्क्रिय ग्राहकांमुळे दूरसंचार कंपन्यांची प्रति ग्राहक सरासरी मिळकत (एआरपीयू) घसरत चालली आहे. यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी दूरसंचार कंपन्या पुन्हा टेरिफमध्ये वाढ करण्याचे नियोजन करत आहेत. यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये मोबाईल टेरिफमध्ये वाढ करण्यात आली होती. तरीही सक्रिय ग्राहकसंख्या वाढली होती.
याने उत्साहित झालेल्या दूरसंचार कंपन्या पुन्हा टेरिफमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या काही महिन्यांच्या आकडेवारीवरून काढलेल्या निष्कर्षानुसार, दोन किंवा तीन कनेक्शन वापरणारे ग्राहक कंपन्यांची सेवा सोडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भारती एयरटेल ही कंपनी प्रति ग्राहक सरासरी मिळकतीच्या वाढीवर लक्ष केंद्रित करत आहे. रिलायन्स जिओ नेटवर्कमधील ग्राहकांची संख्या वाढवण्यावर भर देत आहे. टेरिफमध्ये आणखी एक वाढ करूनही दूरसंचार क्षेत्रातील परिस्थिती खूपच बळकट राहणार असल्याचे दिसत आहे, असे दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
निष्क्रिय ग्राहक गळाले तरी कंपन्यांच्या सक्रिय ग्राहकांची वाढ होत आहे. उदाहरणार्थ, निष्क्रिय ग्राहकांची संख्या कमी झाली असली तरी रिलायन्स जिओचे सक्रिय ग्राहकांच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. फेब्रुवारीत रिलायन्स जिओच्या सक्रिय ग्राहकांची संख्या ९४ टक्के राहिली आहे. ही आतापर्यंतची ग्राहकांची सर्वोच्च पातळी आहे.
देशातील दुसरी सर्वा मोठी कंपनी भारती एयरटेलला या वर्षी एआरपीयू २०० रुपये प्रति महिना होण्याची आशा आहे. डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एआरपीयू १६३ रुपये प्रति महिना होता. अशाच प्रकारे वोडाफोन-आयडियासुद्धा एआरपीयू वाढवण्यावर भर देत आहे. परंतु कंपनीने एआरपीयू रकमेचा खुलासा अद्याप केलेला नाही.