मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील अनेक राज्यामध्ये लम्पी नावाचा त्वचेचा आजार पसरला आहे. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यात जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव झाला असल्याने पशुपालक चिंतेत आहेत. आता या सगळ्याचा परिणाम दुधाच्या दरात होणार असून भाववाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणखी मोठा झटका बसणार आहे. महागाईने होरपळणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे.
लम्पी आजारामुळे पशुधन कमी झाल्याने दूध टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जानेवारी ते मार्चदरम्यान दुधाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. या काळात दूध दरात ५ ते ६ रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर दुधाच्या दरात वाढ झाली असल्याने महागाईचा चटका आणखी तीव्र होणार आहे. तसेच, जानेवारी ते मार्च दरम्यान देशात दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते, असं निरीक्षण इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी नोंदवलं आहे. जनावरांना झालेल्या लम्पी आजारामुळं पशुधन कमी झालं आहे. तसेच चाऱ्याचीही चंटाई निर्माण झाली आहे. याशिवाय दूध पावडरचं उत्पादनदेखील घटलं आहे. त्यामुळे जानेवारीनंतर दूध संकलन कमी झाल्यानंतर मागणीप्रमाणं पुरवठा होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळं दुधाचे दर प्रतिलिटर पाच ते सहा रुपयांनी वाढू शकतात, असा अंदाज आहे.
यंदा परिस्थिती आणखी बिकट
उन्हाळ्यात दुधाचे संकलन कमी होत असतं, त्यावेळी पावडरचा वापर करुन मागणी पूर्ण केली जाते. पण यंदा हा समतोल राखणं कठीण होणार असल्याचे दिसत आहे. आताच्या परिस्थितीत अमूलसह देशभरातील दूध संघांनी दूधाचे दर वाढवले आहेत. हे दर आणखी पाच ते सहा रुपये प्रतिलिटर वाढू शकतात, असा अंदाज आहे.
‘अमूल’कडून वाढ
अमूल कंपनीनं दूधाच्या दरांत प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली आहे. आता एक लिटर फुल क्रीम दुधाचा दर ६३ रुपये प्रति लिटर झाला आहे. सणासुदीपूर्वी आधीच महागाईने जनता होरपळली आहे. अशातच आता दूधाच्या दरांत झालेल्या वाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसणार आहे. यापूर्वीही अमूलने दूधाच्या दरांत वाढ केली होती. दरवाढीपूर्वी दुधाचे दर ६१ रुपये प्रति लिटर होते. मात्र, दुधाच्या दरवाढीबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
Inflation Milk Prices Hike Soon Rupees