मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
देशभरात महागाईने कळस गाठला असून घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल – डिझेल, गहू, गोडेतेल आणि किरणाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचा जगणे कठीण बनले आहे. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती आजपासून चक्क 50 रुपयांनी वाढल्याने गृहिणींचे आर्थिक बजेटही आणखी कोलमडणार आहे. तसेच, पेट्रोल आणि डिझेल सुद्धा आजपासून महागले आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार महागाई कमी करण्यासाठी कोणतेही धोरणात्मक पाऊल उचलत नसल्याने महागाईमध्ये दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उन्हाच्या तडाख्याने सर्वजण होरपळत असताना आता महागाईच्या तडाख्याने सर्वांना चटका बसत आहेत.
आजपासून घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर 50 रुपयांनी महागले आहेत. आतापर्यंत उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील निवडणुकांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून एलपीजी सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दिलासा मिळत होता. यापुर्वी दि. 6 ऑक्टोबर 2021 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर शेवटच्या वेळी बदलण्यात आले होते.
विशेष म्हणजे आजपासून म्हणजेच 22 मार्च 2022 पासून दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 949.50 रुपयांवर गेली आहे. पूर्वी ते 899.50 रुपये होते. कोलकात्या 6 ऑक्टोबर 2021 रोजी 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 926 रुपये होती, ती आजपासून 976 रुपये झाली आहे. मुंबई शहरात यापूर्वी गॅस सिलेंडरचे दर 900 रुपये होते ते आजपासून 949 रुपये 50 पैसे होणार आहेत.
नाशिक मध्ये गॅस सिलेंडरचे दर 910 रुपये होते. ते आता सुमारे 960 रुपये होतील यामध्ये ट्रॅव्हलिंग चार्जेसचाही समावेश करण्यात येतो. काही ठिकाणी ट्रॅव्हलिंग चार्जेस 10 ते 25 रुपये घेण्यात येतात. त्यामुळे आता नाशिककरांना गॅस सिलेंडर सुमारे 950 ते 970 रुपयापर्यंत मिळणार आहे. आणखी काही दिवसांनी गॅस सिलेंडर ची किंमत हजार रुपये होईल की काय ?अशी देखील शंका नाशिककर गृहीणींनी व्यक्त केली आहे
6 ऑक्टोबर 2021 नंतर दि. 21 मार्च 2022 पर्यंत घरगुती LPG सिलेंडर महाग झाले नव्हते. मात्र, या काळात कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल 140 डॉलरचा टप्पा ओलांडला होता. मात्र, या काळात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय बदल झाला. 1ऑक्टोबर 2021 ते 1 मार्च 2022 दरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 275 रुपयांनी वाढ झाली आहे, तर 1 मार्च 2021 ते 2022 दरम्यान घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत केवळ 81 रुपयांनी वाढली आहे. आता घरगुती सिलिंडर 50 रुपयांनी महागला आहे.
सर्वसामान्य नागरिकांसाठी आजचा मंगळवार हा दिलासा नव्हे तर आपत्ती घेऊन आला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरपासून ते पेट्रोल आणि डिझेल आजपासून महाग झाले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले असून नवीन दरानुसार दि.22 मार्चपासून म्हणजेच आजपासून पेट्रोल आणि डिझेल दोन्हीही 80 पैशांनी महाग झाले आहेत.
यापूर्वी मोठ्या प्रमाणात ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र, आजही पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त डिझेल 77.83 रुपये आणि सर्वात स्वस्त पेट्रोल 83.63 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. भोपाळ, जयपूर, पाटणा, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे आहे. मुंबईत पेट्रोल आता 110.82 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95 रुपये आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 136 दिवसांनंतर तेलाच्या किमतीत बदल झाला आहे. दिल्लीतील पेट्रोल पंपांवर डिझेल 87.47 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीतील पेट्रोलची किंमत 96.21 रुपये प्रति लीटर आहे तर घाऊक किंवा औद्योगिक ग्राहकांसाठी त्याची किंमत प्रति लिटर 115 रुपये झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी 4 नोव्हेंबर 2021 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केलेली नाही.
कोणत्याही शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.
प्रदीर्घ काळानंतर पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली असतानाच, आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. 6 ऑक्टोबर 2021 नंतर 22 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले. घरगुती एलपीजी सिलिंडरचे ग्राहक महागाईने होरपळले असतानाच व्यावसायिक सिलिंडर वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे.