नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये दररोज वाढ होत असताना आता एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. इंधनाचे दर वाढल्याने सर्वसानान्यांचे जगणे मुश्लिक होत आहे. देशात एलपीजी सिलिंडरचे नवे दर आज प्रसिद्ध झाले आहेत. यंदा एलपीजी गॅस सिलिंडर एका झटक्यात २५० रुपये महाग झाले आहे. ही वाढ घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी नव्हे, तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये झाली आहे. त्यामुळे सध्या तरी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरधारकांना दिलासा मिळाला आहे. दहा दिवसांपर्वीच घरगुती सिलिंडरचे दर वाढले होते, तर २२ मार्च रोजी व्यावसायिक सिलिंडरचे दर कमी झाले होते.
पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी ग्राहकांना २२ मार्चपासून महागाईचा झळ लागण्यास सुरुवात झाली होती. यंदा विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरमध्ये ५० रुपयांची वाढ झाली. ६ ऑक्टोबर २०२१ नंतर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताच बदल झाला नव्हता. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी घरगुती सिलिंडरचे दर दिल्लीत ९४९.५० रुपये, कोलकातामध्ये ९७६ रुपये, मुंबईत ९४९.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९६५.५० रुपये झाले आहेत.
१९ किलो वजनाचा एलपीजी सिलिंडर दिल्लीत १ मार्चला २०१२ रुपयांमध्ये रिफिल होत होता. तो २२ मार्च रोजी घटून २००३ रुपयांवर आला. परंतु दिल्लीत आजपासून गॅस सिलिंडर रिफिल करण्यासाठी २२५३ रुपये खर्च करावे लागणार आहेत. कोलकातामध्ये आता २०८७ रुपयांऐवजी २३५१ रुपये, मुंबईत १९५५ ऐवजी २२०५ रुपये आणि चेन्नईमध्ये आता २१३८ रुपयांऐवजी २४०६ रुपये द्यावे लागणार आहेत.
एक मार्च रोजी १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १०५ रुपयांची वाढ झाली होती. २२ मार्चला ९ रुपयांनी स्वस्त झाले होते. तर ऑक्टोबर २०२१ पासून एक फेब्रुवारी २०२२ दरम्यान व्यावसायिक सिलिंडरचे दर १७० रुपयांनी वाढले होते. दिल्लीत एक ऑक्टोबर रोजी व्यावसायिक सिलिंडरचे दर १७३६ रुपये होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये हेच दर २००० रुपये आणि डिसेंबर २०२१ मध्ये २१०१ रुपये झाले होते. त्यानंतर जानेवारीमध्ये सिलिंडर पुन्हा स्वस्त झाले आणि फेब्रुवारी २०२२ रोजी आणखी स्वस्त होऊन १९०७ रुपयांवर आले होते. त्यानंतर एक एप्रिल २०२२ पासून दर २२५३ रुपयांवर पोहोचले आहेत.
एलपीजी सिलिंडरचे दर
महिना – दिल्ली – कोलकाता – मुंबई – चेन्नई
१ एप्रिल – २०२२ – २२५३ – २३५१ – २२०५ – २४०६
२२ मार्च – २०२२ – २००३ – २०८७ – १९५४.५ – २१३७.५
मार्च १, – २०२२ – २०१२ – २०९५ – १९६३ – २१४५.५
फेब्रुवारी १, – २०२२ – १९०७ – १९८७ – १८५७ – २०४०
जानेवारी १, – २०२२ – १९९८.५ – २०७६ – १९४८.५ – २१३१
डिसेंबर १, – २०२१ – २१०१ – २१७७ – २०५१ – २२३४.५
नोव्हेंबर १, – २०२१ – २०००.५ – २०७३.५ – १९५० – २१३३
ऑक्टोबर १, – २०२१ – १७३६.५ – १८०५.५ – १६८५ – १८६७.५
स्रोत: IOC