मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सध्या महागाईचा वनवा पेटला असून गॅस सिलेंडरच्या किंमती पन्नास रुपयांनी वाढले आहेत तर पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यातच वाहतुकीचा खर्च वाढल्याने अन्य वस्तूंचे भावही कडाडले आहेत. त्यात आणखी भर म्हणजे जागतिक बाजारपेठेत रशिया आणि त्याच्या पार्श्वभूमीवर कच्चे तेल महागल्याने त्याचा परिणाम बहुतांश देशांवर होत आहे. भारतात देखील हा परिणाम दिसून येतो. सहाजिकच स्थानिक बाजारपेठेत सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत.
अगदी किराणा मालापासून ते भाजीपालापर्यंत वाढलेली दिसून येतात. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू होऊन जवळपास एक महिना झाला आहे. युद्धामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, सर्वसामान्य माणूस महागाईच्या भट्टीत होरपळला जात आहे. कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडू लागले आहे, त्याचा परिणाम सर्व प्रकारच्या वस्तूंवर दिसून येत आहे.
तेलाच्या किंमतीत 20 टक्के वाढ
गेल्या एका महिन्यात भारतीय बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. विशेषतः खाद्यतेल आणि किराणा वस्तूंच्या किमतींत प्रचंड वाढ झाली आहे. भारतात सूर्यफूल तेलाची (पॅक) सरासरी किंमत 151.08 रुपये प्रति किलो होती. आता 25 मार्च रोजी सूर्यफूल तेलाचा भाव 20 टक्क्यांनी वाढून 185 रुपयांवर पोहोचले आहे. त्याचप्रमाणे एक किलो 148 रुपयांना उपलब्ध असलेले सोया तेल 9.83 टक्क्यांनी महाग होऊन 162.64 रुपये झाले. त्याचबरोबर शेंगदाणा तेलात 5.30 टक्के वाढले आता त्याचे भाव 190 रुपये आहे. दरम्यान,परदेशातून येणारे पामतेल एका महिन्यात 13.65 टक्क्यांनी महाग होऊन 151.80 रुपयांवर पोहोचले आहे. तर भाजीपाल्याच्या दरात 9.68 टक्के वाढ झाली आहे.
तांदूळ, गहूही महागले
नाशिकच्या स्थानिक बाजारपेठेत किराणा मालाचे दर प्रचंड वाढलेले दिसून येतात. सागर किराणा दुकानाचे संचालक राजेश जगताप यांनी सांगितले की, पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आहे सहाजिकच मार्च महिन्यामध्ये किरणाचे दर कमी होण्याची वाढलेले दिसून येतात. तसेच खाद्य तेलाच्या भावात देखील वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत: तांदूळ, मैदा, गहू महाग झाला आहे. सामान्य सर्वांच्या मुलभूत गरजा असलेल्या वस्तूंच्या किमतीही रशिया-युक्रेन युद्धानंतर वाढल्या आहेत. अगदी मीठही 1 टक्क्यांनी महागले आहे. या एका महिन्यात तांदळाच्या दरात सरासरी 2 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी गव्हाचे पीठ 2.17 टक्क्यांनी महागले आहे.
भाजीपाल्यांचे दरही कडाडले वाहतूक खर्चात वाढ झालेली भाजीपाल्यांचे दरही कडाडले अशी किरकोळ भाजीविक्रेते समाधान जाधव यांनी सांगितले. एका महिन्यात कांदा 16 टक्के, तर टोमॅटो 8 टक्के बटाट्याच्या दरात केवळ 1.30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बटाटा 25 ते 27, कांदा 30 ते 40 आणि टोमॅटो 30 ते 32 या दराने विक्री होत असून पालेभाज्या व फळभाज्यांची विक्रीतही वाढ झालेली पाच ते सहा रुपयांनी वाढ झालेली दिसून येते विशेषतः फ्लावर, कोबी, पालक, मेथी, शेवगा देखील महाग झाला आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे आजचे दर असे (प्रति किलो)
तांदूळ 32 ते 40
गहू 35 ते 40
चणा डाळ 75 ते 78
तूर डाळ 110 ते 115
उडदाची डाळ 120 ते 122
मूग डाळ 130 ते 132
मसूर डाळ 95 ते 97
साखर 38 ते 41
दूध 45 ते 50
शेंगदाणा 100 ते 122
गूळ 58 ते 60
मीठ पॅक 20 ते 25