मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टाटा समूहाची कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड जोरदार खरेदीसाठी तयारी करत आहे. वास्तविक, टाटा कंझ्युमर पाच ब्रँड खरेदी करण्यासाठी चर्चेत आहे. याद्वारे कंपनीला ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रात आपले स्थान मजबूत करायचे आहे. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी रिलायन्सला चांगलीच टक्कर देण्याचे कंपनीने निश्चित केले आहे.
ब्लूमबर्गच्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे सीईओ सुनील डिसूझा यांनी सांगितले की, कंपनी टेटली टी आणि एट ओक्लॉक कॉफी विकते. आणि आता अनेक कंपन्यांशी करार करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. तथापि, डिसोझा यांनी कोणते ब्रँड खरेदी करण्याची योजना आखली आहे याची माहिती दिलेली नाही.
टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सची स्थापना 2020 मध्ये झाली होती. बाटली बंद पाण्याची कंपनी NourishCo Beverages आणि अन्नधान्य ब्रँड Soulfull यांसारख्या कंपन्यांमधील भागभांडवल विकत घेऊन त्यांनी आपला पोर्टफोलिओ वाढवला आहे.
टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सच्या नव्या वाटचालीमुळे, समूहाला जागतिक दिग्गज युनिलिव्हर व्यतिरिक्त मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलकडूनही कठोर स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. रिलायन्स येत्या काही दिवसात डझनभर लहान किराणा आणि नॉन-फूड ब्रँड्स विकत घेऊ शकते. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या व्यवसायात रिलायन्सचे लक्ष्य तब्बल 6.5 अब्ज डॉलर एवढे आहे.
विशेष म्हणजे, टाटांची नवीन विस्तार योजना ही अशा वेळी आली आहे जेव्हा गंभीर जागतिक चलनवाढीमुळे कंपन्या अडचणीत आहेत. युक्रेनमधील युद्ध, राष्ट्रीय कृषी वस्तूंच्या निर्यातीवरील निर्बंध आणि पुरवठा साखळी समस्यांमुळे इनपुट खर्च वाढला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत टाटा आपली विस्तार योजना कशी राबवतात, कोणते ब्रँड खरेदी करतात आणि ग्राहकांना उत्तम दर्जाच्या वस्तू आणि सेवा कशा देतात याकडे उद्योग जगताचे लक्ष लागून आहे.