मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पगारवाढ हा शब्द कोरोना काळापासून सर्वसामान्य लोकांसाठी परका झाला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये नियमित व्हायची तेवढी सुद्धा पगारवाढ झालेली नाही. उलट अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारातच कपात केली. पण भारतातील एका मोठ्या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना ६२ टक्के पगारवाढ दिली आहे. या बातमीने लोकांना एखादी आश्चर्यकारक घटना घडावी तसा धक्का दिला आहे.
नफा वाटला
कोरोनाच्या पूर्वी गुजरातमधील एका कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगारवाढ, चारचाकी आणि छानसा फ्लॅट भेट दिल्याची बातमी आली होती. त्यानंतर काही कंपन्यांनी कामगिरीच्या आधारावर आपल्या गुणवान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले सुद्धा. पण आता भारतातील सर्वांत मोठा उद्योग समूह असलेल्या टाटा कंपनीने त्यांना झालेला नफा अधिकाऱ्यांसोबत पगाराच्या माध्यमातून वाटून घेतला आहे.
सर्वाधिक वाढ रिटेल साखळीत
२०२२-२३ मध्ये टाटा ग्रुप सेल्समध्ये महसूल ९७ अब्ज डॉलर इतका झालाय जो आतापर्यंतचा सर्वात जास्त आहे. या काळात ग्रुपच्या अधिकाऱ्यांची ग्रोथ २० टक्के झाली आहे. टाटा सन्स बोर्डाच्या संचालकांनी या कंपन्यांच्या टॉप अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल ही बंपर भेट दिली आहे. या पगारवाढीत सॅलरी, कमिशन आणि दुसऱ्या सुविधांचा समावेश आहे. सर्वात जास्त वाढ ही रिटेल साखळीतील ट्रेंटचे सीईओ पी. वैंकटसैलू यांना दिली आहे. त्यांना ५.१२ कोटी सॅलरीसह एकूण ६२ टक्के पगारवाढ कंपनीने दिली आहे. समुहाच्या ट्रेंट, इंडियन हॉटेल्स आणि टाटा कंझ्युमरसारख्या नफा मिळवणाऱ्या कंपन्यातील अधिकाऱ्यांचा पगारात सर्वाधिक वाढ झाली आहे.
१८.२३ कोटी वार्षिक वेतन!
इंडियन हॉटेल्सचे सीईओ पुनीत चटवाल यांना १८.२३ कोटी पगारासह ३७ टक्के वाढ दिली आहे. टाटा कंझ्युमरचे सीईओ सुनील डिसुझा यांना २४ टक्के पगारवाढ देण्यात आली आहे. त्यांचा पगार आता ९.४ कोटींपर्यंत पोहचला आहे. वोल्टासचे प्रदीप बख्शी यांना २२ टक्के आणि टाटा केमिकल्सचे मुकुंदन आणि टाटा पॉवरचे प्रविर सिन्हा यांना प्रत्येकी १६ टक्के वाढ दिली आहे. सर्वात कमी पगारवाढ टीसीएसचे राजेश गोपीनाथन यांना मिळाली आहे. त्यांच्या पगारात १३ टक्क्यांनी वाढ झाली असून पगार २९.१ कोटींवर पोहचला आहे. गोपीनाथन आता टीसीएस सोडून गेले आहेत.
Industry TaTa Company Salary Hike Employees