मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील गळवंच व मुसळगाव येथे इंडियाबुल्स यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात 829 प्रकल्पग्रस्त आहेत. त्यापैकी एकूण वाटप करावयाच्या देय भूखंडाची संख्या 482 असून त्यापैकी 200 प्रकल्पाग्रस्तांना भूखंडाचे वाटप करण्यात आले असून उर्वरित 282 भूखंडाचे वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही कार्यवाही पुढील अधिवेशनपर्यंत पूर्ण केली जाईल, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री विलास पोतनीस, सुनिल शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला होता. इंडियाबुल्स यांच्या विशेष आर्थिक क्षेत्राकरिता ज्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे, त्यांच्या जमीन घेण्यात येणार नसून ज्या शेतकऱ्यांच्या जमीन या प्रकल्पात गेल्या त्यांना उपलब्ध जागेतून जमीन देण्यात येईल, असेही श्री.देसाई यांनी सांगितले.
वीज देयकांसंदर्भातील नवे धोरण लवकरच – डॉ.नितीन राऊत
मुंबई – राज्यातील महावितरणच्या कामाचे विकेंद्रीकरण करून कोकण, पुणे, औरंगाबाद, नागपूर अशी चार प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्यात आले असून महावितरण अंतर्गत 16 परिमंडळ आहेत. महावितरणकडे आजमितीस 80 हजार कर्मचारी कार्यरत असून 2 कोटी 89 लाख ग्राहक आहेत. जानेवारी 2022 अखेर वीज थकबाकीपोटी उच्चदाब वर्गवारीतील 42269 कोटी रूपये तर लघुदाब वर्गवारी थकबाकी 66817 कोटी आहे. ही थकबाकी वसुली संबंधाने राज्य सरकारने कृषी वीज जोडणी धोरण आणले असून यात अंतर्भूत असलेल्या शेतकऱ्यांसाठी 50 टक्के वीज दर शुल्क निर्लेखित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना विलंब आकारही माफ करण्यात आला आहे. तथापि, या योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने नवीन योजना आणली जाईल, त्यात वीज बीलसंदर्भात निर्णय घेण्यात येईल. त्याचप्रमाणे लिफ्ट एरिगेशनबाबत धोरण लवकरच आणले जाईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिले.
कोविडच्या टाळेबंदी काळात महावितरणने 24×7 काम केले आहे. कुठेही वीजकपात करण्यात आली नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले की, शासकीय विभागाकडून 18 हजार कोटी रूपये येणे बाकी आहे. यासंदर्भात शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू असून याबाबत तात्काळ तोडगा काढला जाईल. यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री विलास पोतनीस, सुनिल शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला होता.