इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – असे म्हणतात की, एखाद्याच्या नशीब जर जोरावर असेल तर त्याला अपयश देखील रोखू शकत नाही, इतके यश त्याला मिळते. अर्थात केवळ नशिबावर भागत नाही, तर त्यासाठी जिद्द, चिकाटी, कष्ट आणि प्रयत्न यांची सुद्धा जोड आवश्यक असते. अशाच एका पुण्यातील हुशार आणि धडपड्या नव उद्योजक दांपत्याने यशाला गवसणी घातली, त्यांच्या यशाचे खुद्द जगप्रसिद्ध उद्योजकाने कौतुक केले कोण आहे ते उद्योजक?
पुणे शहरातील अदिती भोसले- वाळुंज आणि चेतन वाळुंज यांनी ‘रेपोस एनर्जी’ नावाचे स्टार्टअप सुरू केले. सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या टाट समूहाने या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. ‘रेपोस एनर्जी’ तर्फे नुकतेच सेंद्रिय कचऱ्यावर चालणारे ‘मोबाईल इलेक्ट्रिक चार्जिंग व्हेईकल’ सोल्यूशन लाँच करण्यात आले आहे. मात्र या स्टार्टअपची सुरूवात नेमकी कशी झाली , त्याला टाटा समूहाचे पाठबळ कसे मिळाले याबद्दलची माहिती अदिती यांनी ‘लिंक्डइन’ वर एका पोस्टमधून शेअर केली आहे. रतन टाटा यांच्या एका फोन कॉलमुळे आपलं आणि रेपोस एनर्जीचं नशीब कसं बदललं, याचा एका अद्भुत किस्साच त्यांनी लिंक्डइनवर शेअर केला आहे.
या पोस्टमध्ये अदिती सांगतात, ” रतन टाटा आणि आमची भेट, ही काही एक सामान्य गोष्ट नव्हे. तो एक अदभुत क्षण होता. त्या भेटीनंतर आमचं नशीबचं बदललं. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी आणि चेतनने ‘रेपोस’ चा प्रवास सुरू केला तेव्हा आम्हाला एका मार्गदर्शकाची आवश्यकता होती. हे स्टार्टअप गतीमान व्हावे, यासाठी ज्यांना या क्षेत्रातील भरपूर अनुभव आहे अशा एक मेंटॉरची आपल्याला गरज आहे, असे मला व चेतनला वाटत होते. त्याक्षणीच आमच्या दोघांच्याही मनात नाव आले ते ‘रतन टाटा ‘ यांचे, मी चेतनला म्हटलं देखील, ‘चल, आपण त्यांना भेटूया’. ‘एवढ्या सहज त्यांची भेट व्हायला रतन टाटा काही माझे शेजारी नाहीत, अदिती,’ असं चेतन म्हणाला, असे अदिती यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांना अनेकांनी सांगितलं की, रतन टाटांची भेट अशक्य आहे.
मात्र त्यामुळे निराश न होता, अदिती यांनी त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले. रतन टाटा यांची भेट घ्यायचीच असा चंगच त्यांनी बांधला. काही दिवसांतच त्यांनी मुंबई गाठली. तंत्रज्ञानाचा वापर करून उर्जेचे वितरण कसे बदलायचे आणि उर्जा व इंधन शेवटच्या मैलापर्यंत कसे पोहोचवायचे, याचे एक 3 डी प्रेझेंटेशन अदिती व चेतन यांनी तयार केले. त्यानंतर, त्यांनी रतन टाटा यांना स्वलिखित पत्र व हे 3 डी प्रेझेंटेशन पाठवले.
तसेच काही व्यक्तींच्या मदतीने रतन टाटा यांना भेटण्यासाठी प्रयत्नही सुरू ठेवले. त्यासाठी ते तब्बल 12 तास रतन टाटा यांच्या घराबाहेर थांबले होते. अखेर थकून भागून रात्री जेव्हा ते हॉटेल रूमवर पोहोचले, तेव्हा रात्री 10 च्या सुमारास त्यांना एक कॉल आला. अदिती यांनी फोन उचलला असता ‘ हॅलो, मी अदिती यांच्याशी बोलू शकतो का?’, असा आवाज आला. तेव्हा अदिती यांनी कोण बोलत आहे अशी विचारणा केली असता ‘ मी रतन टाटा बोलतोय. मला तुमच पत्र मिळाले. आपण भेटू शकतो का?‘ असे वाक्य अदिती यांच्या कानावर पडले. ते ऐकताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या अंगावर आनंदाने काटा आला होता, डोळ्यात अश्रू तरळले. दुसऱ्या दिवशी सकाळी 10.45 अदिती व चेतन, रतन टाटा यांच्या घरी पोहोचले. बरोब्बर 11 वाजता निळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या रतन टाटांशी त्यांची भेट झाली, असे अदिती यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
त्या दिवशी सकाळी 11 पासून ते दुपारी 2 पर्यंत अदिती व चेतन यांची रतन टाटा यांच्यासमोर प्रेझेंटेशन दिले. त्यांचे काम व ध्येय याबद्दल माहिती दिली. त्यानंतर सन 2019 टाटा समूहाने रेपोस एनर्जीमध्ये पहिली गुंतवणूक केली. आणि एप्रिल 2022 मध्ये दुसरी गुंतवणूकीही करण्यात आली. टाटा समूहाशिवाय रेपोस एनर्जीची ही घोडदौड अशक्य होती, अशा शब्दांत अदिती यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, आता या दांपत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Industrialist Ratan Tata Startup Backbone Experience
Aditi Bhosale Walunj Chetan Walunj Reposenergy Fuel Doorstep Delivery