इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय वंशाचे ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक हे पत्नी अक्षता मूर्तीच्या नागरिकत्वाच्या वादामुळे अडचणीत आले आहेत. या आठवड्यात ते या पदाचा राजीनामा देऊ शकतात, असा अंदाज संडे टाइम्सच्या वृत्तात व्यक्त करण्यात आला आहे.
सुनक यांची पत्नी अक्षता ब्रिटनची नागरिक नसल्यामुळे परदेशात कमावलेल्या कमाईवर ब्रिटनमध्ये कर भरत नसल्याचे यापूर्वी उघड झाले होते. दोन दिवसांपूर्वी हा वाद शमवण्यासाठी अक्षताने कुठेही मिळणाऱ्या उत्पन्नावर ब्रिटनमध्ये कर भरणार असल्याचे सांगितले होते. मात्र, तरीदेखील सुनक यांच्या राजीनाम्याविषयी चर्चा रंगवण्यात आली. पण नुकतंच त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
राजकीय विश्लेषक ऋषी सुनक यांचं भविष्य अतिशय उज्ज्वल मानलं जात असल्याचंही सांगितलं. बोरिस जॉन्सन यांनी पद सोडल्यानंतर सुनक पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याचं मानलं जात आहे. दुसरीकडे, वाढत्या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण होत असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत ऋषी सुनक यांनी कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या करात वाढ केली आहे. तेही जेव्हा त्यांची पत्नी अक्षता विदेशातील कमाईवर ब्रिटनमध्ये कर भरत नव्हती. अक्षता मूर्ती या आयटी कंपनी इन्फोसिसमध्ये ०.९ टक्के भागधारक आहेत. यातून त्यांना गेल्या वर्षी ११६० लाख पाऊंड लाभांश म्हणून मिळाले आहेत.
डाऊनिंग स्ट्रीटचे घर सोडले
ऋषी सुनक यांनी शनिवारी सकाळी डाऊनिंग स्ट्रीट येथे फ्लॅट रिकामा केला. त्यांचे सामान आणि काही फर्निचर डाऊनिंग स्ट्रीटच्या मागच्या गेटवर व्हॅनमध्ये भरले गेले आणि पश्चिम लंडनमधील त्याच्या नव्याने बांधलेल्या आलिशान घरात नेले. डेली मिररच्या रिपोर्टनुसार, ऋषी सुनक यांनी डायनिंग स्ट्रीट सोडण्याचा निर्णय आधीच घेतला होता. कारण त्यांच्या मुलीची शाळा दूर पडत होती.