नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकला हवाई सेवा सुरू व्हावी यासाठी अनेकांनी प्रयत्न, पाठपुरावा केला आहे. यातीलच एक म्हणजे उद्योजक मनीष रावल. कोणत्याही शहराच्या विकासासाठी कनेक्टिव्हिटी मग ती रस्ते, रेल्वे आणि हवाई सेवा अशा सगळ्याच बाबतीत महत्त्वाची आहे. नाशिक हे सुवर्ण त्रिकोणातील शहर आहे आणि त्याच्या विकासासाठी हवाई सेवा सुरू होणे आवश्यक होते. सगळ्यांच्या प्रयत्नातून हवाई सेवा नाशिकला यशस्वीपणे सुरू झाली, असे मत उद्योजक रावल यांनी व्यक्त केले.
इंडिया दर्पण फेसबुक लाइव्हमध्ये ते बोलत होते. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याविषयी त्यांनी सांगितले की, आजकाल वेळेला खूप महत्त्व आहे. शहरात एखादा नवीन उद्योग येण्यासाठी कनेक्टिव्हिटी उत्तम असणे आवश्यक आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ नाशिकला येत नव्हते. मुंबईहून चार तास गाडीने नाशिकला येणं हे वेळखाऊ असायचं, त्यामुळे अनेक वर्षे नाशिकचा विकास थांबला होता. पण आता हवाई सेवा झाल्यामुळे हा प्रश्न नक्कीच सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हवाई सेवेसाठी केलेल्या पाठपुराव्याविषयी त्यांनी सांगितले की, पालकमंत्री छगन भुजबळ साहेबांनी हा प्रश्न मनावर घेतला आणि नाशिक एअरपोर्टसंबंधी काम सुरू झाले. नाशिकचे असे पहिले एअरपोर्ट आहे जे पीडब्लूडीने तयार केले आहे. तसेच खासदार हेमंत गोडसे यांनीही खूप पाठपुरावा केला. निमा, आयमाच्या माध्यमातून आम्ही मुंबई, दिल्ली अशा अनेक बैठका झाल्या. नाशिकच्या हवाई सेवेला कार्गो दर्जा आहे. कार्गो हब बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाशिक जिल्हा कृषी उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे. पेरिशेबल वस्तू जर एक्स्पोर्ट केल्या तर नक्कीच त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असे ते म्हणाले.
नाशिकमध्ये येणाऱ्या उद्योगांविषयी ते बोलले की, दिंडोरीतील अक्राळे येथे इंडियन ऑइल, रिलायन्स सारख्या मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे नक्कीच दहा हजारच्या आसपास लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतात. जे तरुण नाशिक सोडून बाहेर जात आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. आजच्या काळात उद्योग हा महत्वाचा आहे. कोणताही उद्योग करताना संयम हा महत्त्वाचा ठरतो. नवनवीन उपक्रम शोधून त्यावर संशोधन करणे आवश्यक आहे. उद्योग सुरू केल्यानंतर स्थिरस्थावर होण्यासाठी, नफा कमवण्यासाठी काही वर्षे जातात हे लक्षात ठेवले पाहिजे, असा सल्ला त्यांनी नवउद्योजकांना दिला.