मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अदानी उद्योग समूहाचे नाव हिंडेनबर्गने कथित गैरव्यवहारात प्रसिद्ध केल्यामुळे झालेला सावळा गोंधळ अद्याप संपलेला नाही. कारण अदानींनी मध्यरात्री कंपनीचा एफपीओ मार्केटमधून गुंडाळण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुंतवणुकदारांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. पण अदानींनी मात्र प्रत्येकाला त्यांचा पैसा मिळेल, असा विश्वास दिला आहे.
जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणारे अदानी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी सध्या गुंतवणुकदारांच्या रडारवर आहेत. त्यांनी एफपीओ गुंडाळल्यानंतर गुंतवणुकदारांचं टेन्शन वाढलं असून आता आपल्या पैश्यांचं काय होणार, याची चिंता त्यांना सतावू लागली आहे. अशात स्वतः गौतम अदानी यांचा एक व्हिडियो एएनआयने प्रसारित केला आहे. त्यात सर्वांना पैसा परत मिळणार असल्याचे सांगत आहेत. शिवाय एफपीओ खरेदी सर्व पैसे गुंतवणुकदारांना मिळणार आहेत, असा विश्वास देताना ते दिसत आहेत. यासोबतच त्यांनी या निर्णयामागची भूमिकाही स्पष्ट केली आहे. अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचे अदानी म्हणतात. शेअर मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण झाल्यानंतर आम्ही एफपीओ व्यवहार सुरू ठेवणं योग्य नैतिकतेला धरून वाटत नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.
आर्थिक स्थैर्य कायम
आमच्या कंपनीची मुलभूत तत्व कायम आहेत. आमची संपत्ती आणि आर्थिक स्थैर्यही कायम आहे. यापुढेही दीर्घकाळ संपत्ती तयार करणं आणि विकासावर लक्ष केंद्रीत करीत राहणार आहोत. शेअर मार्केट स्थिरावला की आपल्या निर्णयांचा पुनर्विचार करू, असं अदानी म्हणत आहेत. या निर्णयाचा नियमीत कामकाजांवर काहीही परिणाम होणार नाही. पुढील प्रकल्पांवर वेळच्या वेळी अंमलबजावणी सुरू राहील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
गुंतवणुकदार महत्त्वाचे
गुंतवणुकदारांच्या विश्वासामुळेच अदानी समूहाला एवढा मोठा प्रवास करता आला आहे. त्यामुळे ते आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत. इतर बाबी दुय्यम आहेत. गुंतवणुकदारांचच नुकसान होऊ नये म्हणून एफपीओ मागे घेतला आहे. मी आयुष्यात जे काही मिळवलं आहे, जे यश प्राप्त केलं आहे ते गुंतवणुकदारांमुळेच शक्य झालं आहे, या शब्दांत अदानी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
https://twitter.com/AdaniOnline/status/1621020375764320256?s=20&t=AJ5uoH2Ysaz60v5O224h5Q
Industrialist Gautam Adani on FPO Return Reason