मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यातील मधुरसंबंध जाहीर आहेत. जुनी मैत्री असलेल्या या दोघांच्या नुकत्याच झालेल्या भेटीने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर झालेल्या या भेटीचा राजकीय अर्थ काढण्यात येत असून नेमका या दोघांमध्ये काय चर्चा झाली असावी, याबाबत आडाखे बांधण्यात येत आहेत.
गौतम अदानी जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते तसेच ते शरद पवार यांनादेखील मानतात. या दोघांची मैत्री जुनी आहे. काही महिन्यांपूर्वी हिंडेबर्गचा खळबळजनक अहवाल आला होता तेव्हा पवार यांनी अदानी यांचा बचाव केला होता. एकीकडे संसदेत विरोधी पक्ष अदानींच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडत होते तेव्हा दुसरीकडे पवार यांनी अदानी यांच्यावर टीका करणे टाळले होते. अदानी मुद्यावरून संसदेचे कामकाजदेखील प्रभावित झाले होते. त्यावेळी पवार यांनी अदानी यांची पाठराखण केली होती. त्यानंतर दोघांच्या काही भेटीदेखील झाल्या होत्या. मात्र, पक्षातील बंडानंतर आता झालेल्या रात्रीच्या भेटीने या दोघांमधील घनिष्ठ संबंधांची चर्चा सुरू झाली आहे. सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी तब्बल तीन तास ही बैठक झाली. राजकीय घडामोडींवर देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे. अदानी हे मोदी आणि पवार यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे आता अदानी महत्वाची भूमिका निभावणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.
शिष्टाचार की अजून काही?
अदानी हे शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेले होते. ही भेट शिष्टाचार आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सट्टेबाजीचा बाजार तापला आहे. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी पक्षात बंड करत भाजपला पाठिंबा दिला आहे.