मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – – गौतम अदानी यांच्याबद्दल हिंडेनबर्गने केलेल्या मोठ्या खुलाश्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स धाडकन कोसळले. एवढेच नव्हे तर जगातील श्रीमंतांच्या यांदीतही मोठी घसरण झाली. शिवाय अदानींच्या इतर उद्योगांनाही मोठा धक्का बसला. मात्र आता जपानच्या एका कॉर्पोरेट घराण्याने त्यांना आधार दिला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये त्यांची सावरण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना अडचणीत आणण्यासाठी अदानी कार्ड वापरले आहे. अदानींची अचानक वाढलेली संपत्ती, श्रीमंतांच्या यादीत त्यांचे वाढलेले स्थान, मोदींचे त्यांच्यासोबत असलेले सख्य आदी मुद्यांवरून त्यांनी भारत जोडो यात्रा आणि त्यानंतर लोकसभेतील भाषण गाजवले. त्यामुळे खरे तर भाजप सरकार हैराण झाले आहे. पण अशातच गौतम अदानींसाठी एक सुखद घटना अलीकडेच घडली आहे.
अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायझेसने जपानमधील एका कॉर्पोरेट घराण्यासोबत भागिदारीचा निर्णय घेतला आहे. अदानी समूह पाण्यापासून ग्रीन अमोनिया आणि ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन करण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणुक करीत आहे. अदानीच्या एका उपकंपनीने ग्रीन अमोनिया आणि ग्रीन हायड्रोजनच्या मार्केटिंगसाठी जपानमधील कॉर्पोरेट घराणे कोवा ग्रुपसोबत जॉईंट व्हेंचर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दोन्ही कंपन्यांनी ५०-५० टक्के भागिदारी असणार आहे.
करार झालाही
अदानी उद्योग समूहाची उपकंपनी अदानी ग्लोबल पीटीई लिमीटेड सिंगापूरने ८ सप्टेंबरला कोवा होल्डिंग्स एशिया पीटीई लिमीटेड (सिंगापूर) सोबत जॉईंट व्हेंचर करारावर स्वाक्षरी केली आहे. मात्र अद्याप याबद्दल अदानी समूहाने कुठलीही माहिती दिलेली नाही. त्याचा लाभ म्हणून शुक्रवारी अदानी समूहाचे मार्केट कॅप ११ लाख कोटींपेक्षाही जास्त झाले. हे केवळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारामुळेच होत असते.
Industrialist Gautam Adani Japan Family Big Deal