मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकेकाळी अदानी उद्योग समूहाचे शेअर्स खरेदी करताना मागचा पुढचा विचार न करणारा गुंतवणुकदार आता दोन पावलं मागे आला आहे. अदानी समूहावरील त्याचा विश्वास कमी झाला आहे. याचा अनुभव आठवड्याच्या पहिल्या दिवशी मार्केट बंद होताना अदानी समूहाच्या दहापैकी सहा कंपन्यांचे शेअर्स तोट्यात राहिले आहेत.
हिंडेनबर्गने फसवे व्यवहार आणि शेअर्सच्या किमतीत फेरफार करण्याचा आरोप अदानी उद्योग समूहावर केला होता. त्यानंतर शेअर मार्केट धाडकन कोसळले होते. त्यातून मार्केट सावरायचेच होते तर अदानींनी एफपीओ गुंडाळला. त्याचवेळी रिझर्व्ह बँक अॉफ इंडियाने अदानींवरील कर्जाचा आढावा घेण्याचे आदेश सर्व बँकांना दिले. त्यामुळे मार्केटमध्ये अदानी उद्योग समूहावरील विश्वास सातत्याने कमी होताना दिसत आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप साडेनऊ लाख कोटींनी घसरले आहे. मार्केटमधील हे नकारात्मक परिणाम अदानींच्या व्यक्तिगत संपत्तीसाठीही अडचणीचे ठरत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मार्केट कॅप १० लाख कोटी रुपयांच्या खाली आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये मार्केट कॅपमध्ये अधिक घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. २४ जानेवारीला अदानी समूहाची मार्केट कॅप १९ लाख कोटी रुपयांहून जास्त होती.
अदानींची संपत्ती ५३ टक्क्यांनी घसरली
मार्केटमधील स्थितीचा गौतम अदानी यांच्या व्यक्तिगत संपत्तीवरही थेट परिणाम झाला आहे. त्यांची संपत्ती गेल्या पंधरा दिवसांमध्ये ५३ टक्क्यांनी घसरली आहे. २४ जानेवारीला त्यांची संपत्ती १९९ अब्ज डॉलर एवढी होती. आता ती ५६.४ अब्ज डॉलर एवढी आहे. नवीन वर्षात त्यांची संपत्ती ६४.२ अब्ज डॉलरने घसरली आहे.
सर्व आरोप खोटे
हिंडेनबर्गने केलेले फसव्या व्यवहाराचे व अफरातफरीचे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा अदानी उद्योग समूहाने केला आहे. आपण सर्व कायदे आणि नियमांचे पालन करूनच व्यवहार करीत असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्जाची अगाऊ परतफेड करणार असल्याची घोषणा अदानी उद्योग समूहाने केली आहे, हे विशेष.
Industrialist Gautam Adani Empire Dipped by 50 Percent