इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सर्वोच्च न्यायालयात अनेकदा आश्चर्यकारक प्रकरणे समोर येत असतात. अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. एका व्यक्तीने विप्रोचे मानद अध्यक्ष अझीम प्रेमजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध सत्तरहून अधिक खटले दाखल केले होते. नंतर त्या व्यक्तीच्या लक्षात आले की आपण असे नाही केले पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्तीने सर्व केसेस मागे घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात अझीम प्रेमजी त्या व्यक्तीविरोधात कारवाई करु शकले असते. पण तसे न करता त्यांनी औदार्य दाखवून त्या व्यक्तीला त्याच्या या वागणुकीबद्दल माफ केले आहे. त्यांच्या या दृष्टिकोनाचे सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केले आहे.
न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने सांगितले की, “अझीम प्रेमजी यांनी या प्रकरणात दाखवलेल्या उदार दृष्टीकोनामुळे त्यांच्याविषयी आदर आणखीनच वाढला आहे. आर. सुब्रमण्यन यांनी त्यांच्याविरोधात ज्या केसेस दाखल केल्या होत्या. त्यांच्या त्या वर्तणुकीबद्दल त्यांना माफ करण्यास सहमती दर्शविली आहे. दोन्ही पक्ष जेव्हा वास्तव समजून घेण्यास तयार असतात, तेव्हा काहीही अशक्य नसल्याचे सध्याच्या प्रकरणावरून दिसून येते”, असे खंडपीठाने म्हटले आहे.
आर सुब्रमण्यम यांनी त्यांच्या भूतकाळातील वर्तनाबद्दल पश्चात्ताप करून त्यांच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू करायचा असल्याने त्यांनी दाखल केलेली सत्तरहून अधिक प्रकरणे वगळण्यात येतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. वरिष्ठ अधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी अझीम प्रेमजींना आर सुब्रमण्यम यांच्या वर्तनाबद्दल माफ करण्याचे सुचवले असल्याचे सांगण्यात आले. आर सुब्रमण्यम यांनी प्रेमजी आणि त्यांच्या गटाविरुद्ध न्यायालयात प्रलंबित असलेल्या विविध कार्यवाही मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या केसेस मागे घेण्यात आल्या आहेत.