इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महाभारतातील कर्णाच्या दानशूरपणाचे अनेकदा दाखले दिले जातात, इतकेच नव्हे तर प्राचीन काळात तसेच इतिहासात अनेक राजे – महाराजे आणि थोर पुरुष होऊन गेले की, त्यांनी आपली संपत्ती गोरबरीबांना दान केली आहे. सध्याच्या काळात आपल्या देशात असे खूपच कमी लोक आहेत की, ते गोरगरिबांना आपली संपत्ती देऊन टाकतात. परंतु उत्तर प्रदेशात असे एक उद्योजक आहेत की, त्यांनी खरोखरच आपली संपत्ती सर्व संपत्ती गोरगरिबांसाठी दान केली आहे.
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील उद्योजक डॉ. अरविंद कुमार गोयल यांनी आपली संपूर्ण संपत्ती गरिबांसाठी दान केली आहे. या मालमत्तेची एकूण किंमत सुमारे 600 कोटी रुपये आहे. गोयल यांनी स्वत:कडे फक्त मुरादाबाद सिव्हिल लाईन्स भागातील एक घर ठेवले आहे. 50 वर्षांच्या मोठया मेहनतीने त्यांनी हे साम्राज्य उभे केले होते.
उद्योजक असलेल्या डॉ. अरविंद कुमार गोयल यांचा जन्म मुरादाबाद इथे झाला. त्यांचे वडील प्रमोद कुमार आणि आई शकुंतला देवी स्वातंत्र्यसैनिक होते. मेहुणे सुशील चंद्रा हे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते. ते यापूर्वी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्षही होते. त्यांचे जावई सैन्यात कर्नल होते तर सासरे सैन्यात न्यायाधीश होते.
विशेष म्हणजे गोयल यांनी थेट राज्य सरकारला देणगी दिली आहे. जेणेकरुन गरजूंपर्यंत मदत पोहोचू शकेल. उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील 100 हून अधिक शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम आणि रुग्णालयांमध्ये ते विश्वस्त आहेत. कोविडमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी मुरादाबादची 50 गावे दत्तक घेऊन नागरिकांना मोफत अन्न आणि औषधे दिली होती.
म्हणून घेतला हा निर्णय
डॉ. अरविंद कुमार गोयल यांनी संपत्ती दान करण्याची घोषणा केली. त्यानंतर संवाद साधताना त्यांनी सांगितले की, मी 25 वर्षांपूर्वीच माझी संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी घडलेल्या एका घटनेचा संदर्भ देत ते म्हणाले की, “डिसेंबरचा महिना होता. मी ट्रेनमध्ये चढताच एक गरीब माणूस थंडीने थरथर कुडकुडत दिसला. त्याच्या पायात ना चप्पल होती, ना अंगावर चादर. त्याला पाहून माझे मन हेलावले. मी स्वत:ला थांवबू शकलो नाही. मी माझे शूज काढले आणि त्याला दिले. मी काही वेळ सहन केले. पण कडाक्याच्या थंडीमुळे माझीही प्रकृती बिघडू लागली होती. परंतु त्या दिवशी मला वाटले की, असे किती गरीब लोक थंडीने गारठत असतील. तेव्हापासून मी गरीब आणि निराधारांना मदत करण्यास सुरुवात केली. आता मी खूप प्रगती केली आहे. आयुष्यात काय घडेल सांगता येत नाही. त्यामुळे जीवंत असेपर्यंत संपत्ती योग्य हातात सुपूर्द केली. जेणेकरुन ही संपत्ती अनाथ, गरीब आणि निराधार लोकांसाठी वापरता येईल. मी जिल्हा प्रशासनाला माझी संपत्ती दान करण्यासाठी पत्र लिहिले आहे. ते पुढील कारवाई करतील, असेही डॉ. गोयल यांनी सांगितले.
डॉ. गोयल यांच्या कुटुंबात पत्नी रेणू, दोन मुले आणि एक मुलगी यांचा समावेश आहे. त्यांचा मोठा मुलगा मधुर गोयल मुंबईत राहतो. लहान मुलगा शुभम प्रकाश गोयल हा मुरादाबाद इथे राहतो आणि वडिलांना व्यवसायात मदत करतो. मुलगी लग्नानंतर बरेली येथे राहते. त्यांच्या या निर्णयाचे त्यांच्या मुलांनी आणि पत्नीने स्वागत केलं आहे.
डॉ. अरविंद कुमार गोयल यांची मालमत्ता योग्य किमतीत विकण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. गोयल स्वतः तीन सदस्य नामनिर्देशित करतील. उर्वरित दोन जणांना सरकार नामनिर्देशित करेल. संपत्ती विकून मिळालेल्या पैशातून अनाथ आणि निराधारांसाठी मोफत शिक्षण आणि औषधोपचाराची व्यवस्था केली जाईल.
गरिबांना केलेल्या मदतीमुळे अरविंद गोयल कायम चर्चेत असतात. गरिबांना मदत केल्याबद्दल डॉ. अरविंद गोयल यांना अनेक वेळा सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांचा गौरव केला आहे.
Industrialist Arvind Kumar Goyal Big Decision For Wealth Donation Moradabad Uttar Pradesh