इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रिलायन्स समूहाचे प्रमुख अनिल अंबानी यांना पुन्हा एकदा व्यावसायिक स्तरावर मोठा झटका बसला आहे. निखिल मर्चंटच्या हेझेल मर्कंटाइल-स्वान एनर्जी कन्सोर्टियम या कंपनीने अनिल अंबानींच्या दिवाळखोर शिपयार्ड कंपनी रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंगसाठी बोली जिंकली आहे. त्यामुळे कंपनीला वाचवण्याचे अनिल अंबानींचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत.
बिझनेस टुडेच्या बातमीनुसार, सुमारे ९५ टक्के कर्जदारांनी निखिल मर्चंटच्या कंपनीच्या बाजूने मतदान केले आहे. आता रिलायन्स नेव्हलचे रिझोल्यूशन प्रोफेशनल लवकरच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) अहमदाबादकडे विजयी बोलीच्या मंजुरीसाठी संपर्क साधणार आहेत. हेझल मर्केंटाइल लिमिटेड आणि स्वान एनर्जी लिमिटेडच्या फर्मने रिलायन्स नेव्हलसाठी सुमारे २७०० कोटी रुपयांची बोली लावली आहे.
अनिल अंबानी सतत रिलायन्स नेव्हलला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. याअंतर्गत अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राने रिझोल्यूशन प्लॅनदेखील दिला होता. तसेच निखिल मर्चंटची कंपनी हेझेल मर्कंटाइल रिलायन्स नेव्हलच्या बोलीमध्ये सहभागी होण्याच्या पात्रतेची आहे का, यावर प्रश्नचिन्हदेखील रिलायन्सने उपस्थित केले होते. सोमवारी, एनसीएलटीच्या अहमदाबाद खंडपीठाने हेझेल मर्कंटाइल कन्सोर्टियमला बोलीपासून अपात्र ठरवण्याच्या रिलायन्स इन्फ्राच्या याचिकेवर सुनावणी केली. आता कोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० मार्च रोजी होणार आहे. मर्चंट यांनी बोली जिंकली असल्याने आता नेमकी सुनावणी काय असणार याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.
गेल्या गुरुवारच्या ट्रेडिंगमध्ये, रिलायन्स नेव्हलच्या शेअरची किंमत ४.२४ रुपये होती, जी एका दिवसाच्या आधीच्या तुलनेत १.४४ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात रिलायन्स नेव्हलच्या शेअरची किंमत ७.१५ रुपये होती, जी ५२ आठवड्यांची सर्वोच्च पातळी आहे.