मुकुंद बाविस्कर, मुंबई
शाळा-शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शन भरतात, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यपातळीवरील ही विज्ञान प्रदर्शने असतात. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार करतात किंवा वेगवेगळे प्रयोग करून संशोधन करून नाविन्यपूर्ण प्रयोग सादर करतात. त्यांच्या कल्पकतेला आणि संशोधनाला दाद मिळून बक्षिसे देखील देण्यात येतात.
विद्यार्थ्यांच्या संशोधन वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळावी, हा त्यामागील उद्देश असतो. केवळ शालेय विद्यार्थी नव्हे तर शाळा बाह्य तरुण असो की एखादी व्यक्ती काहीतरी आगळेवेगळे करून दाखवते, आणि टाकाऊ किंवा भंगार वस्तू मधून उपयुक्त वस्तू बनवू शकते. असाच एक प्रयोग महाराष्ट्रातील एका व्यक्तीने केला असून त्याच्या या प्रयोगाला एका प्रसिद्ध उद्योजकाने दाद दिली आहे, इतकेच नव्हे तर त्याला नवीन वाहन बक्षीस देण्याचे ठरवले आहे काय आहे नेमकी ती गोष्ट…
प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा हे एका माणसाच्या टॅलेंटवर इतके खूश झाले की, ते त्याला जुन्या कारच्या बदल्यात नवी बोलेरो देणार आहेत. एका व्यक्तीने भंगाराच्या धातूपासून कार बनवली आहे. त्यामुळे महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांना ही प्रतिभा पाहून खूप आनंद झाला. दत्तात्रेय लोहार ही व्यक्ती अतिशय हुशार आणि शिक्षित असूनही आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी ही आगळी वेगळी कार बनवली आहे.
एका व्हिडिओमध्ये दिसते आहे की, कल्पकता म्हणजेच जुगाड करून ही जीप तथा कार तयार केली आहे, विशेष म्हणजे ती स्कूटर किंवा बाईकसारखी सुरू होते. या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे आनंद महिंद्रा हे खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, हे काम कोणत्याही नियमांशी जुळत नाही, परंतु मी या व्यक्तीच्या कल्पकतेचे आणि कमी साधनेत जास्त क्षमतेचे काम केल्याचे मी कौतुक करतो.
https://twitter.com/anandmahindra/status/1473543960442327040?s=20
तसेच आनंद महिंद्रा पुढे लिहितात की, स्थानिक आरटीओ अधिकारी त्या व्यक्तीला कदाचित वाहन चालवण्यापासून रोखतील कारण ते वाहन नियमांचे उल्लंघन करते. परंतु या वाहनाच्या बदल्यात मी त्याला वैयक्तिकरित्या बोलेरो देऊ इच्छीतो. खरे म्हणजे आम्हाला प्रेरणा देण्यासाठी, त्या माणसाचे डिझाइन हे महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये प्रदर्शित केले जाऊ शकते.
दत्तात्रेय लोहार यांच्या या जीप- कार जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आनंद महिंद्रा यांच्या ट्विटला 14 हजारांहून अधिक लाईक्स, 1300 हून अधिक रिट्विट्स आणि अनेक टिप्पण्या मिळाल्या आहेत. तसेच अनेकदा आनंद महिंद्रा जेव्हा एखादे स्मार्ट इनोव्हेशनबद्दल काहीतरी वेगळे पाहतात, तेव्हा ते त्याबद्दल कौतुक करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. उलट प्रोत्साहन देतात.