सातपूर : राज्यामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराची वाढती व्याप्ती थांबविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ब्रेक द चैन अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात कलम १४४ लागू केला असून औद्योगिक क्षेत्रासाठी सूचना व निर्बंध लावून उद्योग सुरू ठेवले आहे. प्रत्यक्षात मात्र हे निर्बंध पाळणे अवघड असून इतर व्यापार व व्यवसाय ज्या प्रमाणे पूर्णपणे बंद ठेवले आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुद्धा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात यावे. अशी मागणी कामगार विकास मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
आज सद्यस्थितीत सर्व उद्योगांमध्ये शासनाच्या सर्व निर्बंधांना डावलून कामकाज सुरू आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या सर्व नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत आहे. अनेक कामगारांचा मृत्यू देखील झाला आहे. कामगारांचे कुटुंब बेसहारा झाले आहे. सध्या नाशिकचे परिस्थिती बघता संसर्ग झालेल्या कामगारांना हॉस्पिटल मिळत नाही. तसेच औषधोपचार सुद्धा उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे आजारपणासाठी लागणारा लाखोंचा खर्च करण्याची कुवत सुद्धा सर्वसामान्य या कामगारांची नाही. नाशिक देशात सर्वात जलद प्रसर होणाऱ्या शहरात अव्वल असून सदर आजाराची लागण हवेतून सुद्धा होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सदर आजाराचा प्रसार रोखण्यासाठी तात्काळ पाऊले उचलून संपूर्णपणे लॉक डाऊन करण्याची गरज आहे.
या सर्व बाबींचा विचार करून कोरोनाची साखळी तोडणे करीता व कामगार व कुटुंबीयांची सुरक्षितता व हित लक्षात घेता औद्योगिक क्षेत्रातील कारखाने त्वरित बंद करण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा सर्व कामगार हे कामगार विकास मंच च्या माध्यमातून रस्त्यावर उतरून त्याविरुद्ध आवाज उठविला शिवाय राहणार नाही. असा इशारा निवेदनाद्वारे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांना निवेदनाद्वारे विकास मंचचे कैलास मोरे, महेंद्र अँड महेंद्र चे सेक्रेटरी संजय घोडके, महेंद्र अँड महेंद्र अध्यक्ष नितीन जाधव, सेक्रेटरी संजय घोडके, उपाध्यक्ष संजय घुगे, लिअरचे अध्यक्ष नंदू गायकवाड गॅब्रिअलचे युनियन अध्यक्ष लालचंद साळुंखे, किर्लोस्करचे अध्यक्ष महेश पाटील किंपलासचे अध्यक्ष प्रवीण मोरे,, ऍडव्हान्स इझमईन सिन्नर चे चंद्रकांत डगळे, के एस बी पम्प सिन्नर युनिअन प्रतिनिधी झनकर यांनी दिला आहे.