जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रबोधनकार, कीर्तनकार यांची परंपरा महाराष्ट्रात जुनी आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत तर त्यांनी मोठे योगदान दिले आहे. अलीकडच्या राजकीय परिस्थितीवर सुद्धा कीर्तनकार भाष्य करताना दिसतात. मात्र निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी आमदारानेच आयोजित केलेल्या कार्यक्रमात असे काही विधान केले की त्यामुळे साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या.
हल्लीच्या राजकारणाचा काही नेम राहिलेला नाही. कोण कोणत्या पक्षात जाईल, कुणासोबत सरकार स्थापन करेल, हे सांगता येत नाही. यासंदर्भात आता सर्वसामान्य जनताही बोलायला लागली आहे. याच विषयावर इंदूरीकर महाराज आमदार होण्यासाठी काय लागतं, यावर भाष्य करत होते, पण ते ज्या कार्यक्रमात बोलत होते तो कार्यक्रम एका आमदारानेच आयोजित केला होता. त्यामुळे महाराजांच्या विधानाची चांगलीच चर्चा होतेय. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात इंदूरीकर महाराजांचे कीर्तन ठेवण्यात आले.
इंदुरीकर महाराज कीर्तनातून राजकीय परिस्थितीवर भाष्य करायला लागले आणि त्यातच त्यांनी आमदार होण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, हेही सांगितले. ते म्हणाले, “आमदार होणे सोपे नाही. आमदार होण्यासाठी एक-दोन कारखाने, पाच-सहा कॉलेज, शंभर-दोनशे पतसंस्था, शेकडो बचत गट, हाताखाली हजारेक कर्मचारी लागतात. त्याशिवाय आमदार होता येत नाही.’’ त्यांच्या या विधानानंतर साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. पण त्यानंतर लगेच त्यांनी मंगेश चव्हाण त्याला अपवाद आहेत, असे म्हणत आणि पक्ष कुठलाही असला तरीही आपण आपली माणसं सांभाळायला हवीत, असा सल्ला दिला. त्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.
आता पक्ष राहिलेला नाही
मंगेश चव्हाण जनतेच्या आशीर्वादावर आमदार झाले आहेत, या शब्दांत त्यांचे कौतुक करत इंदूरीकर महाराजांनी आता राजकीय पक्षच अस्तित्वात राहिलेला नाही, असा दावाही केला. सध्या कोण कोणत्या पक्षात काम करतो, हे कुणालाही कळत नाही, असेही ते म्हणाले.
Indurikar Maharaj Kirtan Political Situation MLA Eligibility
Politics Maharashtra